ठाणे : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत 15 जुलै रोजी शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेल्या प्रशिक्षणार्थ्यींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सदिच्छा दिल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते याच्या हस्ते उमेदवारांना निवड पत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

कुशल काम असो, रोजगार असो किंवा उद्योजकता कामात उत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्य असते. तरुणांनी आत्मसात केलेले कौशल्य अधोरेखित करण्यासाठी आणि काळानुसार ते अधिक कुशल होण्यासाठी प्रयत्नशील असणे ही काळाची गरज आहे. जागतिक युवा कौशल्य दिन 2024 ची थीम शांतता आणि विकासासाठी युवकांची कौशल्य (USE SKILL FOR PEACE AND DEVELOPMENT) अशी असून यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले.

त्यावेळी ठाणे आयटीआय चे प्राचार्य स्मिता माने ,सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विजय टिकोले, गंगाराम कर्पे, तसेच गटनिदेशक तृषांत मोटगरे, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार राजेश सोनवणे, निदेशक शर्वरी दुर्गुळे तसेच शिकाऊ उमेदवारी करिता निवड झालेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

प्रशिक्षण घेणारे युवक रोजगार, स्वयंरोजगारासाठी मोलाची भूमिका बजावत असतात. कंपनीसाठी, स्वरोजगरासाठी आवश्यक मनुष्यबळ आयटीआय द्वारे पुरविले जात आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज आयटीआय प्रशिक्षण पूर्ण करीत आहे, त्यामुळे जागतिक युवा कौशल्य दिनाला आयटीआय करिता प्रचंड महत्त्व आहे असे प्रतिपादन प्राचार्य स्मिता माने यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *