नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यास नवी मुंबई महानगरपालिकेने आघाडी घेतली असून यामध्ये लोकसहभाग घेताना त्यातही विदयार्थ्यांच्या सहभागावर विशेष भर दिला जात आहे. या माध्यमातून विदयार्थ्यांना त्यांच्या संस्कारक्षम वयातच स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्व कळावे ही भूमिका असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने ऐरोली विभागात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, सध्याचे दिंडीमय वातावरण लक्षात घेउुन जनजागृतीपर स्वच्छता दिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. अशोक अहिरे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी उपक्रमांत विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक व पालकही उत्साहाने सहभागी झाले.
नमुंमपा शाळा क्रमांक 53 चिंचपाडा यांच्या स्वच्छता दिंडीमध्ये स्वच्छतेसह पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण व संवर्धन, आरोग्य जागरुकता, साक्षर जागरुकता या विषयी घोषणा देत तसेच घोषवाक्यांचे फलक उंचावत जनजागृती करण्यात आली. शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व शिक्षण अधिकारी श्रीम. अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचाही प्रचार करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता, प्लास्टिक प्रतिबंध व माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश तेली तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी श्रीम.जयश्री मधे, श्री.दत्ता मोहरे, श्री.गणेश सकपाळ यांच्यासह वैद्यकिय अधिकारी डॉ. सुषमा सारुक्ते, उदयान सहायक श्रीम.पुनम इंगळे व शिक्षक आणि कर्मचारी हा दिंडी उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले.
अशाच प्रकारची स्वच्छता दिंडी सेक्टर 3 ऐरोली येथे श्रीराम विद्यालयामार्फत काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या व पर्यावरणाच्या घोषणांचा संतांच्या नामवचनांसह जयघोष करीत परिसर दुमदुमून टाकला. या ठिकाणीही माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधाची शपथ घेण्यात आली.
याशिवाय ऐरोली विभागातच सेक्टर 15 येथील इच्छापुर्ती गणेश मंदिराजवळील खाडीकिनारा परिसरात स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली ज्यामध्ये 20 गोणी प्लास्टिक व कागद तसेच तत्सम स्वरुपाचा कचरा गोळा करण्यात आला.
तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात एपीएमसी मार्केट परिसरात अन्नपूर्णा सर्कल ते माथाडी चौक या परिसरात सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.भरत धांडे व उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री.संजीव शेकडे आणि स्वच्छता निरीक्षक श्री.जयेश पाटील यांच्या पुढाकारातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच फळे व भाजीपाला मार्केट बाहेरील परिसरही स्वच्छ करण्यात आला.
कोपरखैरणे विभागात नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 106 मधील नववी व दहावीच्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्रीम.डॉली च-हाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसह कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवित सखोल स्वच्छता केली तसेच देशी वृक्षांची लागवडही केली. कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त श्री. सुनिल काठोळे, स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंग चव्हाण यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छताकर्मींसह ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहीमा सर्वच विभागांत राबविण्यात येत असून त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे.
०००००
