भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचे उपायुक्त रवी पवार यांची बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात अनोळख्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी पवार हे अतिक्रमण नियंत्रण व आस्थापना विभागाचे उपायुक्त आहेत. पवार यांच्या संदर्भात अश्लील भाषा वापरून त्यांची वरिष्ठांकडे तक्रार देण्याची धमकी दिल्याचा एक ई-मेल त्यांच्या मित्राला प्राप्त झाला व नंतर तो पवार यांच्या महापालिकेच्या ई-मेल आयडीवरही आला. त्यानंतर पवार यांच्या अनेक मित्रांनाही त्याच पद्धतीचा ई-मेल पाठविण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी एका अनोळखी व्यक्तीने पवार यांना व्हॉट्सॲप कॉल करून पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास वरिष्ठांकडे तक्रार, तसेच वैयक्तिक बदनामी करण्याची धमकी या व्यक्तीने पवार यांना दिली. त्यानंतर पवार यांच्यासह त्यांचे अन्य सहकारी यांची छायाचित्रे मॉर्फ करून ती समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली. या छायाचित्रांसोबत अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिण्यात आला. यासंदर्भात पवार यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अनोळख्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *