पनवेल : जून महिन्याच्या अखेरीस सिडको महामंडळाने हेटवणे धरण क्षेत्रातील जलसाठा कमी असल्याने २० टक्क्यांची पाणी कपात सिडको वसाहतींमध्ये अंमलात आणली. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना विकतचा बाटला खरेदी करावा लागला. परंतू सोमवारी हेटवणे धरण क्षेत्रात मागील चार दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा ७० टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे लवकरच सिडको वसाहतींमधील पाणी कपात रद्द करण्याचे संकेत सिडको मंडळातील उच्चपदस्थांकडून मिळत आहे.
जून ते जुलै महिन्यात घराबाहेर धो धो पाऊस आणि घरातील नळांना काही मिनिटेच पाणी पुरवठा होत असल्याने खारघर, उलवे आणि द्रोणागिरी या वसाहतींमधील नागरिकांना पाण्याविना जगावे कसा असा प्रश्न पडला होता. मागील अनेक वर्षात जुलै महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष पहिल्यांदा सिडकोवासियांनी अनुभवले. हेटवणे धरण पेण परिसरात आहे. मागील चार दिवसात पेण तालुक्यात ५०० मीलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हेटवणे धरणाची क्षेत्राची क्षमता १४४ दशलक्ष घनमीटर एवढी असून चार दिवसांपूर्वी ४९ टक्के जलसाठा उपलब्ध होता.
सोमवारी सकाळी हेटवणे धरणात ७० टक्के पाणी साठा असल्याची नोंद धरण व्यवस्थापनाकडे नोंदविली गेल्याने सिडकोवासियांची पाणी कपात लवकरच रद्द होईल, अशी चिन्हे आहेत. मागील महिनाभर उलवे, द्रोणागिरी आणि खारघरमधील वसाहतींना झालेल्या २० टक्के कपात आणि कमी दाबाने झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे टँकरने पाणी खरेदी करावे लागले. शेकडो रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी किराणा मालाच्या दुकानातून पाण्याचा बाटला खरेदी करुन पाण्याची तहान भागवावी लागली. धरणात असाच पाऊस बरसल्यास ऑगस्ट महिन्यात धरण इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.