खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज
नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत `शून्य प्रहरा’त उपस्थित केला.
मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत केंद्र शासनाच्या मिठागर विभागाची जमिन मोठ्या प्रमाणात आहे. या जमिनी पालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केंद्राकडे प्रस्तावही पाठवला आहे. मात्र पाठपुरावा करून सुद्धा त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. या जमिनीमुळे प्रस्तावित रस्ता रुंदीकरण, प्रस्तावित नवीन रस्ते, प्रस्तावित नवीन स्टेडियमचे काम रखडले आहे. जमीन हस्तांतरित न झाल्याने शहराचा विकास खुंटला असल्याची बाब नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
जमीन हस्तांतरणासाठी मीरा-भाईंदर महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांची एक संयुक्त बैठक होणे गरजचे होते. मात्र आद्यप अशी बैठक झाली नसल्याबद्दल नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त करत तातडीने ही बैठक आयोजित करण्याची मागणी सभापतींकडे केली. सभापती संध्या रे यांनी विकासकाचा मुद्दा सभागृहात मांडण्यासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे नरेश म्हस्के यांनी आभार मानले.