जालना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे.

गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह जरांगेकडे धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.

खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगेंनी पुढे म्हटलं आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो. रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले. सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे पुढे म्हणालेत.

पडून राहण्यापेक्षा निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी

या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचंं कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *