युनीसेफ चे महाराष्ट्र सल्लागार डॉ. खरात यांचे वक्तव्य

 रमेश औताडे

 

मुंबई :कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षां खालील ४३ टक्के बालके खुजी होण्याचा आणि त्यांचा योग्य विकास न होण्याचा धोका असतो. भारतातही ५ वर्षाखालील ३८ टक्के बालके बुटकी आहेत, देश अती तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे. निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण ताणतणाव आणि वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन अपुरे पडल्याने लाखो बालके अपेक्षित यश संपादन करण्यात आणि मोठे झाल्यावर संपूर्ण सक्षम होण्यात अपयशी ठरतात. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत  युनीसेफ चे राज्य सल्लागार डॉ कारभारी खरात यांनी दिली.
बाळ जन्माला आल्यापासून पहिली दोन वर्ष खूप महत्त्वाची असतात. कारण त्या दोन वर्षात बाळ खूप शिकत असतं. या काळात त्याच्या मेंदूची 75 टक्के वाढ पूर्ण होते, बाळाच्या वाढीसाठी हे ‘ पहिले हजार दिवस ‘ खूप कळीचे ठरतात. या काळात बाळाला योग्य संगोपन, माया आणि योग्य पोषण मिळाले तरच मेंदूची पूर्ण वाढ होण्याची शक्यता वाढते असे डॉ खरात यांनी सांगितले.
‘साऱ्याजणी महिला उत्कर्ष संस्था’  व ‘युनीसेफ’ या लसीकरण प्रकल्प मुख्य अधिकारी सुजाता शिर्के म्हणाल्या, महिला गरोदर असल्यापासून बाळ मोठे होईपर्यत नेमके काय करावे याची माहिती अपुरी असल्याने विविध आजार होतात. गर्भ अवस्थेत मेंदूतील अनेक केंद्र एकमेकांशी जोडली जातात. यामुळे आकलन शक्ती, सामाजिक कौशल्य तसेच संज्ञात्मक आणि भावनिक विकास होतो. हा विकासाचा अति आवश्यक टप्पा आहे. हा विकास होण्यासाठी बाळाला स्पर्ष, प्रेम, आणि पोषणाची जरूरी असते. आई सुदृढ, निरोगी आणि आनंदी असणे, व मुलाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळणे हा प्रत्येक बाळाचा मूलभूत अधिकार आहे.
जन्मलेल्या प्रत्येक बाळाचे योग्य वयात लसीकरण पूर्ण झाले तर या अधिकाराचं संरक्षण अधिक सुलभ होते. पहिल्या पाच वर्षात सात लसी दिल्याने मुलांचे क्षय, पोलियो, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, मेंदूज्वर, रुबेला, कावीळ, अतिसार अशा दहा आजारांपासून संरक्षण होते. सरकारी आरोग्य केंद्रात या सर्व लसी मोफत मिळतात आणि त्यासंबंधी मार्गदर्शन आणि पाठपुरावा केला जातो असे सुजाता शिर्के यांनी सांगितले.
देशाच्या लोकसंख्येत महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. नीती आयोगाने २०१९ मध्ये जाहीर केलेल्या आरोग्याच्या निर्देशांकानुसार राज्य आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाच वर्षखालील मुलांचे मृत्यू दर कमी करण्याचे शाश्वत विकासाचे ध्येय महाराष्ट्राने गाठले असले तरी अद्याप राज्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. सर्वसाधारण एक तृतियांश बालके तीव्र कुपोषित म्हणजे अपेक्षित उंचीपेक्षा बुटकी आहेत आणि प्रत्येक चौथे बालक अपेक्षित वजनाहून कमी, सडपातळ आहे असे डॉ खरात यांनी सांगितले.
वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना योग्य प्रोत्साहन मिळाल्यास अनेक अल्प आणि दीर्घ मुदतीचे फायदे होतात हे पुराव्या निशी सिद्ध झालेले आहे. पण ज्या बालकांना त्यांच्या चांगले पोषण, प्रोत्साहन व प्रेम मिळत नाही, ते आजच्या स्पर्धेच्या युगात मागे पडतात. वंचित कुटुंबामध्ये सुद्धा जन्मलेल्या बालकांसाठी विकासाच्या संधी लवकर उपलब्ध करून दिल्या तर बालकाचे कमी नुकसान होईल व जास्तीत जास्त संभाव्य क्षमतेपर्यत पोहोचणे शक्य होते. बालविकासात गुंतवणूक हा गरीबी संपवण्याचा आणि असमानतेचे चक्र तोडण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आर्थिक वाढीला चालना देऊन समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी बालसंगोपनाच्या धोरणामध्ये सक्रिय प्रतिसाद, योग्य पोषण, विकासाच्या संधी, चांगले आरोग्य आणि सुरक्षित देखभाल, हे पाच महत्त्वपूर्ण घटक ओळखले जातात असे डॉ खरात यांनी सांगितले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *