मुंबई: मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच देशमुख आता बेलवर बाहेर आहेत असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह काही नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला देशमुखांना एकच सांगायचं आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले तेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. त्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख त्यानंतर जेलमध्ये गेले. आताही ते बेलवर बाहेर आहेत.

अनिसचे प्रमुख शाम मानव यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शाम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी मला एकदा विचारायला हवं होतं. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचं काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला शाम मानव लागले का हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *