SLUG ‘फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा, मी पुराव्यांचा पेन ड्राइव्ह बाहेर काढतो’
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओपन चँलेंज दिले. ‘फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा, मी पुराव्यांचा पेन ड्राइव्ह बाहेर काढतो’ असे खुले आव्हानच अनिल देशमुखांनी आज दिले.
फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केल्यानंतर आज देशमुख यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात आरोप करून प्रतिज्ञापत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. याबाबत मी काल वक्तव्य केलं होतं. मी पुराव्याशिवाय कोणतंही वक्तव्य करत नाही. मी जे काही बोललो, फडणवीसांवर आरोप केले, त्याबाबतचे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये पुरावे आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना काल माझ्यावर जो आरोप केला आणि सांगितले की मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलल्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. माझं फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी ते व्हिडिओ सार्वजनिक करावेत,” असं आव्हान देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझे कोणतेही व्हिडिओ नाहीत, फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते तसे बोलले आहेत. मात्र माझ्यावर वेळ आल्यानंतर किंवा कोणी मला चॅलेंज केल्यानंतर मी पेन ड्राइव्हमधील पुरावे सर्वांसमोर आणणार आहे,” अशा शब्दांत देशमुख यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे.
