मिशन ऑलिम्पिक

थेट पॅरिसवरुन-संदीप चव्हाण 

अवघ्या जगाला फ्रेंच राज्यक्रांतीच्याव्दारे समता बंधुता आणि एकतेचा मंत्र देणाऱ्या फ्रान्सच्या राजधानी पॅरिसमध्ये यंदाच्या ३३ व्या ऑलिम्पिकला शुक्रवारी सुरुवात होतेय. अवघं जग या ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये लोटलयं. बॅरिन पिअर द कुबर्तिनने १८९६ मध्ये अथेन्समध्ये क्रीडा जगतातील या महाउत्सवाला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने हार-जीतपेक्षाही तुम्ही लढला कसे याला ऑलिम्पिकमध्ये महत्व आहे असे म्हटले होते. आज कधी नव्हे ते कुबर्तिनच्या या वाक्याची राजधानी पॅरिसच्या रस्त्यावर पदोपदी जाणीव होतेय. जगभरातील निर्वासितांचे थवे फ्रान्समध्ये धडकतायत. अल्जेरियापासून ते सोमालियापर्यंत. लहान बाळांपासून ते अबालवृध्दांपर्यंत. यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पॅरिसच्या रस्त्यावर पदोपदी जाणवतोय. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये निर्वासितांचाही संघ दाखल झालाय. जगण्यासोबतच लढण्यासाठी. युध्दग्रस्त ११ देशातील तब्बल ३७ खेळाडू जगभरातील दिग्गज खेळाडूंसोबत मैदानावर उतरतील तेव्हा कुबर्तिनच्या शब्दात ते विजेते असतील. हार जितपेक्षाही ते खऱ्या अर्थाने जीजानसे लढलेत. यंदा प्रथमच ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पॅरिसच्या जगप्रसिध्द सेन नदिच्या पात्रात पार पाडणार आहे. त्यात विविध देशांचे खेळाडू बोटीतून संचलन करीतल. भारताचे खेळाडूही त्यात असतील पण तेव्हा एक टाळी या निर्वासितांच्या पथकालाही द्यायलाच हवी.

काल पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत आली. येथील प्रतिष्ठेच्या लादेफोन्स भागात विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. लादेफोन्स म्हणजे मीनी इंडिया. उजव्या डाव्या बाजूला बघितला तर एकतरी इंडियन दिसणारच. मराठी टक्काही येथे खुप आहे. आणि म्हणूनच या भागातून जेव्हा ऑलिम्पिक ज्योतीचा प्रवास झाला तेव्हा त्यावेळी खात भारताच्या ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेत्या अभिनव बिंद्राला येथे आमंत्रित करण्यात आले होते.

भारताचे एकुण ११७ खेळाडू १७ क्रीडा प्रकारात ९५ मेडलसाठी झुंज देतील. टोकीयाच्या तुलनेत यंदा ७ खेळाडू कमी आहेत. टोकीयाला १२४ खेळाडूंचे पथक होते. टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताने एतिहासिक ७ मेडलची कमाई केली होती. त्यात भालाफेकपटू निरज कुमारच्या गोल्डमेडलचाही समावेश आहे. त्यामुळे ही कामगिरी उंचावण्याचे आव्हान भारतापुढे असेल. महाराष्ट्राचे पाच खेळाडू यंदाच्या ऑलिम्पकसाठी पात्र ठरले आहेत. त्यात एथलेटिक्समध्ये अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी, सेलिंगमध्य विष्णू सर्वानन, तिरंदाजीत प्रविण जाधव यांचा समावेश आहे.

ऑलिम्पिकमध्ये धडकणे हीच मोठी कामगिरी असते. त्यामुळे पुढील १५ दिवस खेळातील या महामहोत्सवाचा आनंद लुटुया… युध्दमय जगात खेळाव्दारे शांतीचा संदेश पोहचवण्यासाठी जगभरातील दहाहजाराहून अधिक खेळाडू सज्ज झालेत. चला त्यांच्या जग जिंकण्याच्या मोहीमेत आपणही सामिल होऊय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *