अशोक गायकवाड
रत्नागिरी
शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांकरिता प्रशिक्षण कोर्सेस सुरु करावेत, त्यासाठी १ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली.
रत्नागिरी पंचायत समिती, दामले विद्यालय आणि नगर परिषद अंतर्गत सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी भिकाजी कासार, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, राजन शेट, बाबा नागवेकर, सुहेल मुकादम आदी उपस्थित होते.पालकमंत्री सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले तारांगण वर्षभरात ५२ हजार विद्यार्थ्यांनी पाहिले आहे. याच ठिकाणी सायन्स सिटीचे लोकार्पण केले जाईल. रत्नागिरीत झालेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे रोजगार निर्मितीत निश्चितपणे वाढ होणार आहे. शिक्षण सप्ताह या सप्ताहापुरता मर्यादित ना ठेवता वर्षभर चालावा. विद्यार्थ्यांना सुविधा मिळावेत, यासाठी प्रामाणिक काम करावे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकच प्रयत्न करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन शिक्षण विभाग करत आहे,’ असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे आणि नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
00000