मुंबई : मुसळधार पावसाचा तडाका पुणे, मुंबईसह ठाणे आणि कोकणाला बसला असून पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला ग्राऊंड झिरोवर उतरण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे. शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग नागरिकांना काढावा लागत आहे. दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे आणि कोकण परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे.

बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील काही भागांत दौरा करुन पाहणी केली. तर, प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. त्यातच, मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज 25 जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तर, उद्या सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, पुणे-मुंबई व मुंबई-पुणे येथील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.

CHOKAT 1

पूर पीडितांच्या मदतीसाठी85 जणांची टीम तैनात

पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत.

लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले तयारीत आणि सुसज्ज आहेत.

मुंबई, ठाणे, रायगड,पालघरला रेड अलर्ट

मुंबई :  महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने  मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट दिला आहे.  मुंबईभोवती पाणीच पाणी साचले आहे. मिठी, उल्हास नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.  अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं योगी धाममध्ये लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क उभारण्यात आलाय. या पार्कच्या बाजूलाच वालधुनी नदी आहे . गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिटी पार्क जलमय झालाय.

मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम

मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वे 20 ते 25, हार्बर 15 ते 20 तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने  तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने धावत होत्या.  हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.

मिठी नदी धोकादायक पातळीजवळ वाहत आहे.  कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागातील वासहतींना सतर्कतेचा इशारा दिली असून सध्या नदीची पातळी 2.6  मीटरवर वाहत आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी माईक घोषणा देऊन इशारा  दिला आहे.

पावसामुळे दहावी आणि बारावीचे पुरवणी परिक्षा पुढे ढकलल्या

मुंबई :  मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग आणि पालघरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने 10वी व 12वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर 12 वीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  उद्या (25 जुलै)  होणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  26 जुलै रोजी होणारा दहावी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा पेपर  31 जुलै रोजी होणार आहे.
तर बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा उद्याचा पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *