रायगड : गेली १४ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास येत नसल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच एआयएमआयएमच्या वतीने देखील आता कठोर निर्णय घेवून प्रशासनाला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. येत्या रविवारी २८ जुलै रोजी एआयएमआयएमच्या वतीने माणगाव येथे होमहवन करण्यात येणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्गाला कोकणकर नेहमीच पाहिली पसंती देत असतात. कोकणातील होळी, गणपती, दसरा तसेच अन्य कार्यक्रमांना कोकणातील चाकरमानी आपल्या गावी पोहोचतात. मात्र गेल्या १४ वर्षांपासून कोकणातील जनतेला महामार्गावरील प्रवासाचा वनवास भोगावा लागत आहे. कोकणातील स्थानिक आमदार असोत किंवा खासदार देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहेत. कोणी आवाज उठवीत नाहीत. मग कोकणकर चाकरमान्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी केवळ मलिद्याच्या मागे धावत आहेत का ? असा सवाल देखील एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी विचारत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या रविवारी २८ जुलै रोजी माणगाव येथील महामार्गावर होमहवन करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच या होमहवन प्रसंगी कोकणातील समस्त नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
