लडाख : कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील १९९९ च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी कारगिल युद्ध स्मारकालाही भेट दिली. यावेळी २० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लडाख, अग्निपथ योजना आणि विरोध यावर भाष्य केले. पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान मोदी यांनी आम्ही दहशतवादाचा पूर्ण ताकदीने मुकाबला करू असे म्हटलं आहे.

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त पाकिस्तानला कडक इशारा दिला. पंतप्रधानांनी लडाखमधील शिंकुन ला बोगद्यासाठी पहिला स्फोट देखील केला.  शिंकुन ला बोगदा प्रकल्प निमू – पदुम – दारचा रोडवर सुमारे १५,८०० फूट उंचीवर बांधला जात असून तो पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात उंच बोगदा असेल. कारगिल वॉर मेमोरिअल येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भाषण केले.

“२५ वर्षांपूर्वी भारताने कारगिल युद्ध केवळ जिंकले नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचे अद्भुत उदाहरण दिले. पाकिस्तानला प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून चर्चेत राहायचे आहे. त्यांनी त्यांच्या इतिहासातून काहीच शिकलेले दिसत नाही. यापूर्वी दहशतवादाबाबत त्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. मी जिथून उभा आहे तिथून माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असावा. त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत विकासासमोरील प्रत्येक आव्हानाला नक्कीच पराभूत करेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“लष्करातील सुधारणांना आमचे पहिले प्राधान्य आहे. अग्निपथ योजना हा त्याचाच एक भाग आहे. अनेक दशकांपासून लष्कराला तरुण बनविण्यावर संसदेत चर्चा होत होती. अनेक समित्यांमध्ये हा विषय मांडण्यात आला, मात्र हा बदल करण्याची इच्छाशक्ती यापूर्वी दाखवली गेली नाही. पण सत्य हे आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातील कर्तबगार तरुणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“काही लोकांच्या विचारसरणीला काय झाले आहे हे मला कळत नाहीये. पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा भ्रम ते पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचारांची मला लाज वाटते. पण मला अशा लोकांना विचारायचे आहे की मोदी सरकारच्या राजवटीत आज जो कोणी भरती होईल त्याला आजच पेन्शन द्यावी लागेल का? त्यांना पेन्शन देण्याची वेळ ३० वर्षात येईल आणि तोपर्यंत मोदी १०५ वर्षांचे होतील. तुम्ही कोणता युक्तिवाद देत आहात? माझ्यासाठी पक्ष नाही तर देश सर्वोच्च आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *