शिवप्रेमींच्या संतापानंतर पालिकेची दिलगिरी

 

 

ठाणे : घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला कसा ? असा संताप सरनाईकसह शिवप्रेमींनी व्यक्त केला . तर अन्य मालमत्तांच्या यादीत किल्ल्याचे नाव चुकून आल्याने तो भाड्यावर दिला जाणार नसल्याचे सांगत पालिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे .
मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत बांधकाम विभागा कडून शहर अभियंता दिपक खांबित यांनी पालिकेच्या अनेक मालमत्ता ह्या भाड्याने देण्या बद्दल प्रस्ताव दिला होता . त्या यादीत ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा समावेश होता . खांबित यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर होऊन तसा ठराव केला गेला .
मात्र भाड्याने देण्याच्या मालमत्ता यादीत घोडबंदर किल्ल्याचा समावेश केल्याचे समजताच शिवसेना शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देऊन ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्राचे वैभव असून पवित्र असा किल्ला भाड्याने देण्याचा ठराव रद्द केला नाही तर आंदोलन करू असा इशारा दिला .
शहर अभियंता खांबित यांनी पत्रक काढून , ठराव यादीमध्ये नजरचुकीने ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख झालेला असून ती मानवीय चुक झाली असल्याचे स्पष्ट केले आहे . किल्ला हा महानगरपालिकेच्या मालकीचा नसल्याने भाडे तत्वावर देण्याचा कोणताही मानस नाही. शिवप्रेमी व जनतेची दिशाभुल झाली याबद्दल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदरच्या ठरावात दुरुस्ती करुन नव्याने ठराव पारित करण्यात येईल असे प्रतिपादन आयुक्त काटकर यांनी केले आहे.
मुळात घोडबंदर किल्ला हा ऐतिहासिक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्श झालेला किल्ला आहे . पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील किल्ला पालिकेला केवळ देखभालीसाठी दिला असून भाड्याने देण्याचा अधिकारी पालिकेला नाही . पुरातत्व विभाग आणि शासनाची मंजुरी न घेता घोडबंदर किल्लाच भाड्याने ठेकेदारास देण्याचा लाजिरवाणा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक शिवप्रेमींनी केली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *