ठाणे : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 प्रदर्शन शनिवार दिनांक 27 जुलैपासून ठामपा शाळा क्र. 19 विष्णुनगर, ठाणे येथे सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी 5.00 वा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व ठाण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न् होणार आहे. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देवून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साराज करावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरणस्नेही घटकांपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तसेच पुठ्ठ्यापासून बनविलेली १० फूट उंच भव्य सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृतीच तसेच केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेले भव्य मखर हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. तसेच इतर सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्री देखील या प्रदर्शनात केली जाणार आहे.
याचबरोबर महाराष्ट्रातील विविध भागांतून कुशल मूर्तिकारांनी शाडू माती, लाल माती, गोमय, पुठ्ठा तसेच कागदाचा लगदा व पर्यावरणस्नेही रंग इत्यादींपासून बनविलेल्या लोभस गणेशमूर्ती हे या उत्सवाचे आकर्षण असणार आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक पदार्थांपासून बनविलेले मखर व सजावटीचे आकर्षक पर्याय येथे उपलब्ध असणार आहेत.
उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले असून ‘पर्यावरणपूरक उत्सव – काळाची गरज’ या विषयावर तज्ञ व्यक्तींचा परिसंवाद, नागरिकांसाठी निष्णात मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा, कागद – पुठ्ठा यापासून सजावटीचे साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सेल्फी विथ बाप्पासाठी या ठिकाणी सेल्फी पाँईटही देखील उपलब्ध केला असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. सदरचे प्रदर्शन 4 ऑगस्ट 2024 पर्यत सकाळी 11 ते रात्री 10.00 वाजेपर्यत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
००००
