संदीप चव्हाण

 

मिशन ऑलिम्पिक पॅरिसच्या मातीची बातच न्यारी आहे. जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुताचा मंत्र देणारी हीच ती भुमी. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने अवघ्या जगाला ‘मानवी हक्कांचा जाहिरनामा’ मिळाला. त्यातील १७ कलमातून मानवाला त्याच्या वैयक्तिक, सामाजिक आणि नैर्सिगक हक्काची जाणीव करुन देण्यात आली.  याच फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक असणाऱ्या जीन-जॉक रुसोची ही पॅरीस भुमी. रूसोने लोकशाहीची स्वातंत्र्यसमता व बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती. रुसोच्या याच मानवी सनदेतून प्रेरणा घेत फ्रान्सच्या बॅरेन पिअर द कुबर्तिनने ग्रीसच्या अथेन्समध्ये आधुनिक ऑलिम्पिकला जन्माला घातले. आज त्याच कुबर्तिनच्या मायभुमित पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा रंगला. जगाला आधुनिकतेसोबतच मुल्यांची जाण देणाऱ्या फ्रान्सने यंदाही आपली ही परंपरा कायम राखली. न भुतो न भविष्यती असा उद्घाटन सोहळा त्यांनी आयोजित केला. ‘अवघा आकाश एक झाला,’ असेच या सोहळ्याचे वर्णन करता येईल.

जुन्या परंपरा मोडीत काढून नव्याची कास धरायची हा जीन-जॉक रुसोचा मंत्र अंमलात आणत यजमान पॅरिसने पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर खुल्या आकाशाखाली हा सोहळा यशस्वी करून दाखविला. तब्बल सव्वा दोन लाख मोफत तिकीटे आणि एक लाख चार हजार विकत तिकीटे या उद्घाटन सोहळ्यासाठी वितरीत करण्यात आली होती. तब्बल ८० मेगा स्क्रीन पॅरिसमध्ये ठिकठिकाणी उभारण्यात आल्या होत्या. याशिवाय जगभरातील दिडशे कोटी लोकांनी या ऑलिम्पिक सोहळ्याचा आंनंद टेलिव्हिजनवरून लुटला. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये मुठभर लोकांसमोर उद्घाटन सोहळा आयोजित न करता समतेच्या ब्रिदवाक्यानुसार सर्वांसाठी हा सोहळा आयोजित करण्याचे यजमान फ्रान्सचे हे धाडस कौतुकास्पद आहे. विशेषता जगभरात अतिरेकी हल्ल्यांची भीती असताना हा धोका पत्करणे केवळ फ्रान्सवासीयच जाणो. इसपुर्व ५७० ला जन्मलेला ग्रीसचा तत्ववेता पायथागोरस आपल्याला गणिती प्रमेयासाठी माहित असतो. काटक-कोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो हे पायथोगोरसचे जगप्रसिध्द प्रमेय. पण त्याहीपलिकडे प्राचिन ऑलिम्पिकच्या व्यावसायिकेतवरील  त्याचे भाष्य आजही तितकेच अजरामर आहे. ऑलिम्पिकमधिल काटकोनाला छेद देत पायथोगरस म्हणतो की ‘ऑलिम्पिक म्हणजे काही जणांसाठी वस्तुंची विक्री-खरेदी करुन नफेखोरी करण्याची संधी आहे. काहींसाठी यात सहभागी होऊन विजयाचा आत्मसन्मान मिळविण्यासाठीची जीवनमरणाची लढाई आहे आणि काहींसाठी हा फक्त आनंद लुटणारा एक सोहळा आहे. ऑलिम्पिकच्या बदलत्या या जगात पायथोगोरस आणि रुसोआजही तितकेच पथदर्शी आहेत हेच खरे… अब्जावधी रुपयांची नफेखोरी करणारे जसे इथे आहेत तसेच युध्दजन्य देशातील निर्वासित आत्मसन्मानासाठी रुसोच्या या भुमीत दाखल झालेत. मानवी मुल्यांना जिवित राखण्यासाठी या निर्वासितांसोबत अवघं जग पॅरिसमध्ये दाखल झालेत. पायथागोरच्या भाषेत आपण नफेखोर नाहीत, खेळाडूही नाहीत म्हणूनच आत्मसन्मानासाठी झुंजणाऱ्या या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी पुढील १७ दिवस आपला सहभाग आपण देऊया… इतके तर आपण करूच शकतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *