ठाणे – ठाणे ते कर्जत, कसारा, बदलापूरला जाण्यासाठी पुरेशा लोकल फेऱ्या नसल्याने ट्रान्सहार्बरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकलवर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यामुळे ठाणे स्थानकावरून अतिरिक्त शटल सेवा चालविण्याची मागणी ठाणे रेल्वे प्रवास संघटनेकडून करण्यात आली.
ठाणे रेल्वे स्थानकात ट्रान्स हार्बरवरून येणारे प्रवासी फलाट क्रमांक नऊ व दहावर उतरतात. या प्रवाशांना कल्याण, कसारा, कर्जत, खोपोली या डाऊन दिशेकडे जाण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यातच या गाड्या गर्दीने भरून येत असल्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढताही येत नाही. त्यामुळे ठाणे स्थानकात येथे गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण होत असते. परिणामी, या स्थानकांवरील गर्दी कमी करण्याकरिता या प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणेहून कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, अंबरनाथ या ठिकाणी जाण्याकरिता शटल रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ वाचविण्याकरिता ठाणे- उरण व सीएसएमटी- उरण अशी रेल्वेसेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी ठाणे रेल्वे प्रवास संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मध्य रेल्वे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.
0000
