अशोक गायकवाड
पालघर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’, ‘मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना’ व इतर महत्त्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना असून त्या नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे,तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्य सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. सामान्य नागरिकांचे बँकेमध्ये खाते नव्हते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेमार्फत सामान्य नागरिकांचे खाते बँकेमध्ये सुरू करून त्यांना स्थिरता प्रदान केली असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कोरोना काळामध्ये कर्तव्यावर असताना मृत्यु झालेले चिंचणी ग्रामपंचायत येथील वरिष्ठ लिपिक जयेश धांगडा यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच तलाठी पदाचे नियुक्ती पत्र पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
