अशोक गायकवाड

 

 

अलिबाग : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण १२ हजार ३२८ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यात्तील ४७ हजार ६८ वादपूर्व प्रकरणे व १२ हजार २९६ प्रलंबित अशी एकूण ५९ हजार ३६४ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १० हजार २६५ वादपूर्व प्रकरणे व २ हजार ६३ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण १२ हजार ३२८ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी ४४ लक्ष ८२४ रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. २ जोडप्यांचा लोक अदालत मध्ये संसार जुळला रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात २ जोडप्यांचा (पनवेल १, अलिबाग १) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. मोटार अपघात प्रकरणांमध्ये ४ कोटी १४ लाख ४४ हजार ५४६ रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर जिल्हयामध्ये एकूण ३४ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ४ कोटी १४ लाख ४४ हजार ५४६ रुपये इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.एस. राजदेकर व पॅनलवरील न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व प्रतिकात्मक धनादेश दिला. रायगड जिल्‌ह्यातील विविध न्यायालयांत २७ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.
या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *