मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच मातोश्रीबाहेरील आंदोलनामुळे काहीसा तणाव झाला होता. हे आंदोलन दरेकरांनी सुपारी घेऊन घडवून आणल्याचा आरोप जरांगेनी केला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदींनी आपली भुमिक स्पष्ट करावी अशी मागणी केली.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासह धारावी प्रकल्प आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्याचा अधिकार राज्यांना नाही. यापूर्वी बिहारला आरक्षण दिलं होतं, ते कोर्टाने उडवलं. त्यामुळे, आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर हा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत यायला तयार आहे. मराठा, ओबीसी सर्वच समजाने मोदींकडे गेलं पाहिजे. कारण, मोदी हे स्वत: सांगतात की, मी मागास प्रवर्गातून येतो. लहानपणी ते गरिब होते, त्यांना गरिबीतला संघर्ष माहिती आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे, त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
आरक्षण वाढविण्यासाठी लोकसभेत काही तोडगा निघत असेल, तर आज मी सर्वमान्य पाठिंबा द्यायला तयार आहे. मला प्रामाणिकपणे मराठा आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे, असं वाटतं. पण, तो न्याय त्यांना राज्यात हे राज्यकर्ते असताना मिळेल, असं वाटत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही. मराठा आरक्षण हे ससंदेतून द्यावे लागेल, असे म्हणत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, आरक्षणावर मोदींनी तोडगा काढावा, मी पाठिंबा देईन, असे म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. आपण इकडे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकदा दिल्लीत जाऊन मोदींपुढे हा प्रश्न मांडला पाहिजे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
मराठा आंदोलक मातोश्रीबाहेर आंदोलक करत आहेत, यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मी समाजाला दोष देत नाही, कारण सगळ्याच समाजाची लोकं साधी माणसं आहेत. त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे, पण आरक्षणाला कायद्याने काही मर्यादा आखलेल्या आहेत. आमचं सरकार पाडून अडीच वर्षे झाली, पण अद्यापही या सरकारने तोडगा का काढला नाही, असेही ठाकरेंनी म्हटले.
श्याम मानव यांच्या राज्यासाठी काही सामाजिक अपेक्षा आहेत, त्यासाठी ते सर्वांची भेट घेत आहेत. त्याच अनुषंगाने माझ्या भेटीसाठी आले होते, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. अनिल देशमुख ह्यांनी त्याहीवेळेस स्पष्ट सांगितलं आहे, त्यांना जो अनुभव आलेला आहे तो, घृणास्पद काम करणारे लोकं सत्तेवर बसले आहेत. हे सगळं अमानुष आहे. हे कुटुंब बघत नाहीत, मुला-बाळांवर घाणेरडे आरोप करुन बदनाम केलं जातंय. उद्या त्यांच्या मुलाबाळांवर अशा घाणेरड्या पद्धतीने आरोप केले, जे घडलंच नाही. त्यावेळी, त्यांना कळेल आई-वडिलांचं दु:ख काय असतं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आम्ही तर असं समजू की, आताचा भाजप हा अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणारा आहे, ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
