उद्यान उभारणीसाठी पालिकेने काढली निविदा

 

 

 

ठाणे : गेले अनेक वर्षे कागदावर असलेल्या मनोरंजन (ॲम्युजमेंट पार्क) आणि हिमोद्यान (स्नो पार्क) प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून पालिका प्रशासनाने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कोलशेत परिसरात दीड लाख चौरस मीटर क्षेत्रावर खासगी लोकसहभागातून विकसित करण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी जागा आरक्षण फेरबदलांचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने शासनाकडे महिनाभरापुर्वी मंजुरीसाठी सादर केला असून त्यापाठोपाठ आता प्रकल्प उभारणीच्या कामासाठी ठेकेदार निश्चित करण्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरूवात केली आहे. यामुळे ठाणेकरांना नमो सेंट्रल पार्क पाठोपाठ मनोरंजनाचे नवे ठिकाण उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्पाच्या परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कल्पतरु विकासकाकडून हे उद्यान विकसित करून घेतले आहे. या उद्यानास नागरिकांची पसंती मिळत असतानाच, त्यापाठोपाठ आता याच भागात मनोरंजन (ॲम्युजमेंट पार्क) आणि हिमोद्यान (स्नो पार्क) प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहे. २०१७ मध्ये पालिका प्रशासनाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. परंतु गेले अनेक वर्षे हा प्रकल्प विविध कारणांमुळे कागदावरच असल्याचे चित्र होते. दरम्यान, गेल्यावर्षी पासून पालिका प्रशासनाने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून गेल्यावर्षी पालिकेने सल्लागार कंपनीची नियुक्ती करून प्रकल्पाचा सविस्तर आराख़डा तयार केला होता.
कोलशेत परिसरात दीड लाख चौरस मीटर क्षेत्रावर खासगी सहभागातून मनोरंजन आणि हिमोद्यान उद्यान विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात पार्क आरक्षण अशी नोंद आहे. या जागेवर मनोरंजन आणि हिमोद्यान उद्यान विकसित करायचे असेल तर त्याठिकाणी ॲम्युजमेंट पार्क व कन्हेन्शन सेंटर असा आरक्षण फेरबदल करणे आवश्यक आहे. यामुळे महापालिका विकास आराखड्यात तसेच एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये जागा फेरबदल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यावर आलेल्या हरकती आणि सुचनांवर आयुक्तांनी निर्णय घेऊन हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकड़े सादर करण्याकरिता प्रशासकीय सर्वसाधारण सभेने महिनाभरापुर्वी मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ पालिका प्रशासनाने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ठेकेदार निश्चित करण्याकरिता निविदा प्रक्रीयेला सुरूवात केली असून त्यासाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत.
काय आहे प्रकल्प : उद्यान सुविधा
कॉफी कप, सन ॲण्ड मुन, फॅमिली रोलर-कोस्टर, सिक्स रिंग-रोलर कोस्टर, कोरीजील, स्टिंग टॉवर ४५ मीटर, ड्रॉप टॉवर, डिस्को कोस्टर जायंट व्हील, पेंन्ड्युलम आणि फॅन्टसी प्लॅनेट अशा सुमारे आठ ते दहा ड्राय राईड्स असतील.
इतर सुविधा व आर्कषण
९ डी सिनेमा, एचडी सिनेमा, हॉरर हाऊस, मोटर मेज, इको पार्क आणि नेचर ट्रेल, वाहनतळ, उपहारगृह, दुकाने, प्रदर्शन सभागृह, कार्यक्रम सभागृह, अंतर्गत खेळाचे प्रकार, हॅप्पी स्ट्रीट अशा सुविधा असणार आहेत. ५०० नागरिक हिमोद्यानात एकाच वेळी फिरू शकतील, अशी व्यवस्था. उद्यानात कपडे बदलण्याची जागा, वातानुकूलित क्षेत्र, डिजिटल आणि फोटोशॉप, तिकीट कक्ष असेल.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *