वसई : सणासुदीच्या काळात ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करून नागरिकांचे तोंड गोड करणाऱ्या सरकारने मात्र सद्यस्थितीत कडूपणा आणला आहे. पालघर जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना सर्व्हर डाउनचा फटका बसला आहेत. ऑनलाईन प्रक्रिया होत नसल्यामुळे अन्नधान्यापासून तीन लाख ४७ हजार लाभार्थ्यांना वंचित राहावे लागते. रेशन दुकानात धान्य कधी मिळणार, यासाठी रोज विचारपूस करण्यासाठी लाभार्थ्यांची रांग लागत आहे; मात्र धान्य मिळत नसल्याने रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे.
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागात आर्थिक दुर्बल घटकातील अनेक कुटुंबे आहेत. अनेकांना मोलमजुरीसाठी स्थलांतर करावे लागते. कुटुंबातील काही सदस्य रोजगारासाठी पायपीट करतात. मात्र महागाई असल्याने अन्य ठिकाणच्या दुकानातून धान्य घेणे परवडत नाही. त्यामुळे रेशन दुकानाचा आधार आर्थिक दुर्बल घटकाला होत असतो, मात्र २० जून रोजी नवीन मशीन प्रत्येक दुकानात देण्यात आली; परंतु सर्व्हर डाउनमुळे डोळ्याचे स्कॅनिंग व हाताच्या ठशांची नोंद घेता येत नाही. त्यामुळे धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. जिल्ह्यात आदिवासी समाज हा रेशनिंगवर अवलंबून असतो, परंतु २० जुलैपासून पूर्णपणे मशिन कार्यरत नाही. काही तरी धान्य मिळेल, या आशेने रोज लाभार्थी दुकानात रांग लावत आहेत. सर्व्हर डाउन असल्याने हाताचे ठसे, तसेच डोळे टिपणे शक्य होत नाही. परिणामी धान्य न घेताच माघारी फिरावे लागत असल्याने आमची चूल पेटणार कशी, असा टाहो लाभार्थी फोडू लागले आहेत.
स्वस्त धान्य दुकानदारांना सरकारने दिलेल्या ई-पॉस मशीन काही दिवसांपासून बंद झाल्यामुळे लाभार्थ्यांचे हाल सुरू आहेत. ऑनलाइन धान्य घेतल्याचे नोंदणी होत नाही. परिणामी लाभार्थ्यांसह दुकानदारांनाही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे लाकडी बहीण योजना, पदवीधरांना पैसे, शेतकऱ्यांसाठी योजना अशा घोषणा सरकारकडून केल्या जात असल्या तरी सद्यस्थितीत मिळणारे धान्यच नशिबी नसल्याने लाभार्थी आर्थिक चिंतेत सापडले आहेत.
सरकारी नियमानुसार धान्य घेतल्यावर मशिनवर अंगठ्याद्वारे नोंदणी केली जाते; परंतु मागील काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाइन नोंदणी बंद झालेली आहे. जुलैचे धान्य वाटपासाठी महिन्याची मुदत संपली आहे. धान्य घेतल्याची ई-नोंदणी न झाल्यास शिधापत्रिकाधारकांचे नाव ऑनलाइन नोंदणीमधून नाव बाद होण्याची चिन्हे दिसत आहे.
गहू तीन किलो, तांदूळ पाच किलो प्रति माणसी असे एका महिन्याला धान्य मिळते, तर आनंदाचा शिधामध्ये रवा, पोहे, पामतेल, हरभरा डाळ, गूळ, मैदा, साखर मिळते. परंतु काही दिवसांपासून हा लाभ मिळत नाही.
00000000000
