स्वाती घोसाळकर

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेल्या मख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नोंदणीचा नवा विक्रम झाला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना एक कोट एंशी लाख बहीणी मिळाल्या आहेत. अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल झाल आहेत. या अर्जांची आता छाननी सुरु आहे. नारीशक्ती दूत ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज प्राप्त होत आहेत.

राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने सुरु केलेल्या या योजनेत महिलांच्या नोंदणीचा लवकरच २ कोटींचा टप्पा पार होईल अशी माहीती शिवसेना उपनेते, प्रवक्ते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी दिली. आज बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 नारीशक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत. त्याशिवाय नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशन्सचे ८८ लाख डाऊनलोड्स झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला या ॲपचे ८०० डाऊनलोड्स होत आहेत. सगळ्यात जास्त डाउनलोड होणाऱ्या ॲपमध्ये नारीशक्ती दूत ॲप देशात २७ व्या क्रमांकावर आहे. या ॲपमधून प्रत्येक मिनिटाला ६५० अर्ज सादर केले जात आहेत. इतका प्रचंड प्रतिसाद या आधी कोणत्याही योजनेला मिळालेला नाही, असा दावा निरुपम यांनी केला. या योजनेला मिळणारा तुफान प्रतिसाद हे राज्यातील माता भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे, असे निरुपम म्हणाले.

या योजनेसाठी राज्यातून किमान २ कोटी ते २.५ कोटी महिला पात्र ठरतील, असे सरकारने उदिद्ष्ट ठेवले आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जे ॲप्लिकेशन येतील तेवढे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती निरुपम यांनी दिली. मुंबई आणि परिसरात नोंदणीसाठी शिवसेना पक्षाकडून २ ऑगस्ट २०२४ पासून प्रचार अभियान सुरु केले जाईल, असे निरुपम म्हणाले.

राज्यातून सर्वात जास्त नोंदणी पुणे जिल्ह्यातून झाली आहे. पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत ८ लाख ६३ हजार महिलांनी फॉर्म भरले आहेत. योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा निरुपम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, या योजनेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे एकही रुपया मागितलेला नाही. ही राज्य सरकारची स्वतःची योजना आहे. काँग्रेससारखी खटाखट योजना नाही. मुख्यमंत्री शब्द पाळणारे आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’साठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अर्ज केलेल्या ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा होतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या योजनेचा लाभ  मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे.एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त 14.2 किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.

योजनेची कार्यपद्धती नेमकी काय?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलिंडचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल. केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांचा थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलिंडर ८३० रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. दि.१ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दि. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *