लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख
उल्हासनगर – दोन वर्षांपूर्वी ड्रेनेजची साफसफाई करणाऱ्या रोबोटला गणतंत्र दिनाच्या चित्र रथावर स्थान मिळाल्याने महानगरपालिकेचे नाव राज्य पातळीवर गाजले होते. आता महाराष्ट्रातील दुसरा पशु दाहिणीचा प्रकल्प उल्हासनगरात उभा राहत आहे. या दाहिणीत लहान-मोठ्या पशूंची क्षणात राख होणार आहे. या प्रकल्पामुळे महानगरपालिका पुन्हा एकदा प्रकाशझोतात येणार आहे.
मुंबईत एकमेव पशु दाहिणीचा प्रकल्प असून इतर कोणत्याही शहरात नाही. त्याअनुषंगाने आयुक्त डॉ. अझिझ शेख यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्या देखरेखीखाली पशु दाहिणी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झालेले आहे.
शहरात अनेक तबेले,गौशाळा असून त्यात असंख्य गाईम्हशी आहेत. तसेच पाळीव श्वान,मांजरी असून भटक्या श्वानांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एखाद्या पशुचा मृत्यू झाल्यावर त्याची विल्हेवाट लावायची कशी हा प्रश्न पशूंच्या मालकांना भेडसावत होता. आता दिवाळी दरम्यान पशु दाहिणीचा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यामुळे पशूंच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली निघणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांनी दिली.
नंतर महाराष्ट्रातील ही दुसरीच शव दाहिणी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या व लांबच्या शहरातील मृत पशूंसाठी या शव दाहिणीचा वापर करण्यात येणार आहे. ही दाहिणी 20 गुंठ्याच्या जागेत उभारण्यात येत असून त्यात लहान व मोठ्या पशूंसाठी दोन कंपार्टमेंट असल्याचे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.
०००००
