दिल्लीत एका कोचिंग क्लास मध्ये पाणी शिरूर त्यात तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहाजिकच हे प्रकरण संसदेत चर्चिले गेले. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी या कोचिंग क्लास संस्कृतीवरच जोरदार प्रहार केले असल्याचे वृत्त आहे. ही कोचिंग क्लासवाली मंडळी शिक्षणाचा व्यापार करत असून पैसे कमावण्याचा यांनी गोरखधंदा सुरू केला आहे या शब्दात धनखड यांनी आसूड ओढलेले आहेत.
उपराष्ट्रपतींचा हा संताप अगदी रास्तच म्हणावा लागेल. कारण गेल्या सुमारे पन्नास वर्षात देशभरात हा कोचिंग क्लास चा रोग इतका फोफावला आहे की शाळा किंवा महाविद्यालय आणि त्यातील शिक्षण ही संकल्पनाच आता मोडीत निघालेली दिसते आहे.
आज जे वाचक साठी ओलांडलेले आहेत, ते सांगू शकतील की ते शिकत असताना कोचिंग क्लास लावणे किंवा शिक्षकाची वेगळी शिकवणी लावणे हे कमीपणाचे लक्षण समजले जात होते. जो विद्यार्थी अभ्यास करत नाही किंवा मठ्ठ डोक्याचा आहे अशाच विद्यार्थ्याला शिकवणी लावली जात होती. जे विद्यार्थी हुशार समजले जायचे ते कधीच शिकवणी लावत नव्हते.
नंतर साधारणपणे १९६५-६६ या कालखंडात परिस्थिती हळूहळू बदलू लागली. या काळात विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली होती. प्रत्येक विद्यार्थ्याला इंजीनियरिंग किंवा मेडिकलकडे जाण्याची ची इच्छा होऊ लागली होती. विद्यार्थ्यांचे तर सोडा, पण माय बापांचे सुद्धा ते स्वप्न ठरू लागले होते. त्यामुळे मग शाळेत जे काही शिकवले जाते त्यापेक्षा अतिरिक्त शिकवणी कशी मिळू शकेल या दृष्टीने आई वडिलांनी शोध सुरू केला. त्यातूनच ही कोचिंग क्लासची संस्कृती विकसित होऊ लागली.
पूर्वी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विषय अगदी मुळापासून तर टोकापर्यंत सविस्तर शिकवला जात असे. त्यामुळे फक्त गुण मिळवायचे ही संकल्पना बाजूला ठेवून विद्यार्थ्याला त्या विषयाचे समग्र ज्ञान कसे होईल हे बघितले जात होते. मात्र कोचिंग क्लास संस्कृतीत हे मान्य नव्हते. तिथे आधीच्या पाच किंवा दहा वर्षातले प्रश्नसंच एकत्रित करून त्यांचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला जात असे. त्याचा अगदी फडशा पाडला जात असे. त्यातही संभाव्य प्रश्न कोणते येतील याचाही अंदाज घेतला जात असे आणि त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात असे. त्यामुळे मग कोचिंग क्लास मध्ये गेलेला विद्यार्थी जास्त गुण मिळवतो असे चित्र निर्माण होऊ लागले. त्याचाच परिणाम म्हणजे आई-वडिलांची मुलांना कोचिंग क्लास मध्ये पाठवण्याची मानसिकता वाढू लागली.
त्याचा फायदा कोचिंग क्लास संचालकांनी घेतला नसता तरच नवल. या कोचिंग क्लास संचालकांनी त्या काळात हजारो रुपयात शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. त्यासाठी कित्येक शिक्षकांनी त्यांच्या चालू असलेल्या नोकऱ्या सोडल्या आणि स्पष्ट भाषेत बोलायचे झाले तर नोटा छापण्याचे कारखाने सुरू केले. आज हेच कारखाने अगदी खेड्यापाड्यापासून महानगरापर्यंत कुटीर उद्योगासारखे फोफावलेले आहेत. आज विद्यार्थी नववीत पोहोचला की आई वडिलांना त्याच्यासाठी कोचिंग क्लास कोणत्या लावायचा ही चिंता सुरू होते. त्यासाठी मग जमवून ठेवलेले लाखो रुपये बाहेर काढले जातात.
विशेष म्हणजे हे कोचिंग क्लास मध्ये जाणारे विद्यार्थी मग महाविद्यालयात जातच नाहीत. ते कोचिंग क्लासच्या भरवशावरच आपला अभ्यास करत असतात. दहावी नंतर अकरावी बारावी साठी तर कोणता कोचिंग क्लास लावायचा यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. खास म्हणजे हे कोचिंग क्लास वाले कोणत्यातरी एखाद्या टुकार कॉलेजेस शी टाय अप करतात आणि आमच्या कोचिंग क्लास मध्ये ऍडमिशन घेतली तर कॉलेजची सोय देखील आम्हीच करू असे गाजर दाखवतात. विद्यार्थ्याने या कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेतला की त्याचे नाव त्या कॉलेजमध्ये देखील नोंदवले जाते. नंतर दोन वर्षात विद्यार्थ्या कधीच कॉलेजमध्ये जात नाही. शेवटी विज्ञान विषयाचा विद्यार्थी असला तर फक्त प्रात्यक्षिक परीक्षेसाठीच तो कॉलेजमध्ये जातो. त्याला कॉलेज व्यवस्थापन पूर्ण वर्षाची उपस्थिती पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देत असते. एकूणच शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही किती गैरप्रकार चालतात हे यावरून दिसून येते.
या कोचिंग क्लासच्या गोरखधंद्यात फायदा भरपूर असतो. त्यामुळे विद्यार्थी आपल्याकडे जास्तीत जास्त गर्दी करून यावे यासाठी मोठमोठ्या जाहिराती देखील हे कोचिंग क्लासेस संचालक देत असतात. दस्तूरखुद्द उपराष्ट्रपतींनीच याकडे लक्ष घेतले आहे. या जाहिराती फक्त वर्तमानपत्रात असतात असे नाही, तर शहरात मोक्याच्या जागी मोठमोठे होर्डिंग्स देखील लावले जातात. आता तर इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवरही जाहिराती दिल्या जातात. सध्या इंजिनियर आणि डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी असा उल्लेख करून प्रसारित होणारी एक जाहिरात वृत्तवाहिन्यांवर सातत्याने गाजते आहे.
या कोचिंग क्लास संचालकांचे कित्येकदा शिक्षण मंडळातही साटे लोटे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोणत्या कोचिंग क्लास चा विद्यार्थी प्रथम येतो किंवा कुठले विद्यार्थी जास्त संख्येत मेरिट लिस्ट मध्ये येतात त्यावर या कोचिंग क्लासेस रेटिंग ठरत असते. काही वेळा तर असे बोलले जाते की जो विद्यार्थी पहिला येतो त्याच्याशी डील करून त्यालाच पैसे देऊन तो आमच्या क्लासमध्ये शिकला म्हणून पहिला आला अशी त्याची जाहिरात केली जाते. आपल्याला लहानपणी शाळेत शिक्षक खोटेपणा करू नका असे शिकवायचे. इथे या शिक्षणक्षेत्रात सगळाच खोटा प्रकार होताना दिसतो आणि हा प्रकार दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळेच अशा दुर्घटना होतात.
मोठ्या शहरातील काही कोचिंग क्लासेस गाजलेले आहेत. मग त्या शहरात बाहेरगावचे विद्यार्थी येऊन प्रवेश घेतात आणि आपले शिक्षण पूर्ण करतात. त्यामुळेच काही कोचिंग क्लास संचालकांनी कोचिंग क्लास सोबत होस्टेलचीही सोय केलेली आढळून येते. अर्थात या सर्वच सोयींसाठी वारेमाप पैसा वसूल केला जातो.
त्यामुळेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासारखा संवेदनशील माणूस कुठेतरी दुखावतो. धनखडांनी आपली वेदना व्यक्त केली. आज देशात करोडो नागरिक असे आहेत की ते देखील या कोचिंग क्लासच्या गोरखधंद्यामुळे अस्वस्थ आहेत. मात्र त्यावर उपाय काय हे त्यांना आज तरी सुचत नाही हे निश्चित.
यासाठी विद्यमान शिक्षण पद्धती बदलणे ही प्राथमिकता राहणार आहे. आजची ही जीवघेणी स्पर्धा बाजूला ठेवून शिक्षणातून विद्यार्थी एक जबाबदार माणूस म्हणून कसा घडवला जाईल हे बघणारी शिक्षण पद्धती आता गरजेची झाली आहे. हे करत असताना ही कोचिंग क्लास पद्धत कायद्याने बंद व्हायला हवी. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनाही काही बंधने घालायला हवीत. जर शिक्षकांनी गांभीर्याने शिकवले आणि विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर त्यांना कोणत्याही कोचिंग क्लासची गरज पडणार नाही.
त्यासाठी सर्वांचीच इच्छाशक्ती आवश्यक आहे. ही इच्छाशक्ती दाखवणारा समाज आधी घडवावा लागणार आहे. तसेच झाले तरच ही परिस्थिती सुधारू शकेल. अन्यथा अजूनही वाईट अवस्था आपल्याला बघावी लागू शकते.
