28 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ त्वरित वितरित करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार समाजविकास विभागाच्या वतीने लाभ वितरणास सुरूवात झालेली असून पहिल्या टप्प्यात पात्रता निश्चित झालेल्या 3174 विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात 2 कोटी 15 लक्षाहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम डिबीटीव्दारे जमा करण्यात आलेली आहे. तसेच या आठवड्यात पात्रता निश्चित केलेल्या 25 हजार 417 विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात रू. 19 कोटी 67 लाखाहून अधिक रक्कम डिबीटी व्दारे जमा करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती तत्परतेने वितरित केली जावी असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले होते. शिष्यवृत्ती वितरणासाठी अर्ज तपासणी, कागदपत्रांची त्रुटी आढळणा-या अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी कालावधी देणे अशा कार्यालयीन प्रक्रियेसाठी समाजविकास विभागास कालबध्द नियोजन करून देण्यात आले होते. आयुक्त महोदयांमार्फत याचा सातत्याने आढावा घेतला जात होता. या अनुषंगाने प्रक्रियेस गती देत प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरण करण्यास सुरूवात झालेली आहे.
सन 2023-2024 या आर्थिक वर्षात शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देणे करिता 08 फेब्रुवारी 2024 रोजी वृत्तपत्रात जाहीर आवाहन प्रसिध्द करुन महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. याकरिता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांच्या विनंतीनुसार प्रथम 15 मार्च पर्यंत व त्यानंतर 31 मार्च 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली.
त्यानुसार सर्व घटकांतर्गत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरिता एकूण 40635 अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होते. त्यामधून प्रथम टप्प्यात 5594 एवढ्या लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करून लाभ देणेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आले होते. तथापि, 15 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तसेच त्यानंतर पदवीधर मतदार संघ निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने या लाभार्थ्यांना लाभ देता आला नाही.
तथापि आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार आचारसंहिता कालावधीत याबाबतची अंतर्गत कार्यालयीन कार्यवाही करण्यात येऊन या प्रक्रियेस गती देण्यात आली. त्यास अनुसरून सन 2023-24 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण घटकांतर्गत विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे आणि आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई क्षेत्रातील महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे या योजनांव्दारे 18 जुलैला पहिल्या टप्यात एकूण 3174 विद्यार्थ्यांना रु. 2 कोटी 15 लक्ष 42 हजार 800 इतकी शिष्यवृत्ती रक्कम डिबीटीव्दारे वितरीत करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्रता निश्चित केलेल्या 25,417 विद्यार्थ्यांना एकूण रु. 19 कोटी 67 लक्ष 20 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डिबिटीव्दारे या आठवडयात जमा केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील महिला, मुली, निराधार, विधवा, मागासवर्गीय घटकातील युवक – युवती, महिला. पुरूष, प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार, खुल्या प्रवर्गातील गरजू बेरोजगार युवक – युवती इ. विविध घटकांतर्गत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यासाठी पात्र असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
0000