आज ३१ जुलै, चार दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक, सूरसम्राट मोहम्मद रफी यांचा स्मृती दिन. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला पंजाब राज्यातील कोटला सुल्तानसिंह या गावात झाला. मोहम्मद रफी यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. मोहम्मद रफी १४ वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब लाहोरला स्थलांतरित झाले. तिथेच त्यांनी शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक उस्ताद बडे गुलाम अली, उस्ताद अब्दुल खान, पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी या महान शास्त्रीय गायकांकडे संगीताचे धडे गिरवले. पंजाबी चित्रपट गुल बलोच पासून त्यांनी चित्रपट गायनाला सुरवात केली. या चित्रपटातील त्यांच्या आवाजातील गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या आवाजाने प्रभावित होऊन फिरोज निजामी यांनी त्यांना लाहोर रेडिओला नोकरीला लावले. ते रेडिओवर गाणी म्हणू लागली. रेडिओवरील त्यांची गाणी ऐकून जे. बी. वाडिया यांनी त्यांना आपल्या बाजार या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची विनंती केली ती मोहम्मद रफी यांनी मान्य केली. या चित्रपटातील सातही गाणी मोहम्मद रफी यांनीच गायली. ती सर्व गाणी लोकप्रिय झाली. त्याकाळातील लोकप्रिय संगीतकार नौशाद यांनी त्यांना अनेक चित्रपटात संधी दिल्या. पुढे या जोडीने हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले. संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी म्हणजे चित्रपट सुपरहिट असे समीकरणच बनले. मोहमद रफी यांच्या आवाजाने नौशाद यांच्यावर अक्षरशः मोहिनी घातली होती. ५० च्या दशकात नौशाद रफी साहेबांव्यतिरिक्त कोणत्याही गायकासोबत काम करत नव्हते. या दोघांनी लोकप्रिय संगीताचा वापर करून चित्रपट सृष्टीतील गीतांचे आयामच बदलून टाकले. बैजू बावरा, उडण खटोला, कोहिनूर, मेरे मेहबूब, दिल लिया दर्द दिया, संघर्ष या लोकप्रिय झालेल्या चित्रपटांचे संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी ही जोडी प्रसिद्ध होती. ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन, मदन मोहन, रोशन या संगीतकरांचेही मोहम्मद रफी हे आवडते गायक होते. या संगीतकरांनी दिलेले संगीत आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली. १९५० ते १९८० असा सुमारे ४ दशकांचा काळ मोहम्मद रफी यांनी अक्षरशः गाजवला. गुरुदत्त, दिलीपकुमार, राजकपूर, देवानंद, शम्मी कपूर, शशी कपूर, राजेंद्र कुमार, सुनील दत्त, राजकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, ऋषी कपूर अशा सर्व नायकांना त्यांनी आवाज दिला. या सर्व नायकांना महानायक करण्याचे काम मोहम्मद रफी यांच्या आवाजाने केले. मोहम्मद रफी यांच्या आवाजाने तरुणाईला वेड लावले होते. त्यांची सर्व गाणी इतकी लोकप्रिय झाली की ती आजही गायली जातात, ऐकली जातात. मोहम्मद रफी यांनी सर्व प्रकारची गाणी गायली. केवळ हिंदीतच नाही तर उर्दू, पंजाबी, मराठी, तेलगू या भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली. त्यांची गाणी केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रिय झाली. मोहम्मद रफी यांना गायनासाठी सहा वेळा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. भारत सरकारनेही पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाचा स्टॅम्पही तयार केला आहे. ३१ जुलै १९८० ला रात्री १० वाजून ५० मिनिटांनी मोहम्मद रफी यांनी जगाचा निरोप घेतला. मोहम्मद रफी यांच्या अंत्ययात्रेत दहा हजारांहून अधिक चाहते उपस्थित होते. २०१३ मध्ये भारतीय हिंदी सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने बिबीसी एशिया नेटवर्कने एक सर्व्हे केला. त्यात मोहम्मद रफी हेच हिंदी चित्रपट सृष्टीतील महान गायक म्हणून नावाजले गेले. मोहम्मद रफी हे केवळ गायक म्हणूनच नाही तर व्यक्ती म्हणूनही महान होते. मोहम्मद रफी नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यात पुढे असत. त्यांनी काही संगीतकारांसाठी फुकट गाणीही गायली आहेत. रॉयल्टी साठी त्यांनी कधी कोणाला अडवले नाही. त्यांच्या विषयी लता मंगेशकर म्हणतात, मधुर स्वभावाचा सुरीला माणूस. माझे भाग्य आहे की माझी बहुतेक गाणी मी त्यांच्यासोबत गायली आहेत. संगीत न समजणाऱ्या लोकानांही त्यांनी कानसेन बनवले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ आनंद बक्षी यांनी लिहिले होते की, न फनकार तुझसा, तेरे बाद आया, मोहम्मद रफी तू बहोत याद आया…..

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *