अशोक गायकवाड
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला असून, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पाम टेक कंपनीच्या ३ अत्याधुनिक बीच क्लिनींग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिन्स ट्रक्टरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून, किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे. या बीच क्लिनींग मशिनचे संबंधित ग्रामपंचायतींंना हस्तांतरण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते बुधवारी (ता.३१) पोलीस विभागाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे नेहमी दिसून येते. शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवून किनारे स्वच्छ करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी स्वच्छतेसाठी पाम टेक कंपनीची जर्मन बनावटीच्या ३ मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. बुधवारी या मशिनचे हस्तांतरण संबंधित ग्रामपंचायतींंना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
या समुद्रकिनाऱ्यांची होणार स्वच्छता
पहिली मशिन : आक्षी, नागांव, रेवदंडा.
दुसरी मशिन: वरसोली, थळ, नवेदर नवगाव.
तिसरी मशिन: किहिम, आवास, सासवणे.
0000
