अशोक गायकवाड

 

 

रायगड : रायगड जिल्ह्यात स्वच्छता चळवळ गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त होण्यासोबत गावांमध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) झाला आहे. स्वच्छतेबाबत जिल्ह्यात लोकसहभाग वाढत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या व हागणदारीमुक्त झाल्याचे निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील गावांना ‌‘ओडीएफ पल्स’चा दर्जा देण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग अंतर्गत ओडीएफ प्लस अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. ओडीएफ प्लसमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वती राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा व अंगणवाडी तसेच सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, गाव स्वच्छ ठेवणे आदी कामे करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व गावांनी हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रायगड जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायत असून, १ हजार ८३२ महसूली गावे आहेत. ही सर्व गावे ओडीएफ प्लस झाली आहेत.

*चौकट*
जिल्ह्यात ओडीएफ प्लस अंतर्गत करण्यात आलेली कामे
• घराघरात शौचालयांचे बांधकाम.
• शाळा अंगणवाड्यांमध्ये शौचालय बांधकाम.
• गावात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालये.
• गावात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत विविध कामे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *