Month: July 2024

मेट्रोचे गर्डर वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात

मध्यरात्रीपासून घोडबंदर मार्गावर मोठी कोंडी     ठाणे : घोडबंदर येथील जुना टोलनाका भागात मेट्रो मार्गिकेचे गर्डर वाहून नेणाऱ्या अतिअवजड वाहनाचा अपघात झाल्याने घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर गायमुख घाट ते वाघबीळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ठाण्याहून बोरीवली, वसई, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले आहेत. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत आहे. मध्यरात्रीपासून ही वाहतूक कोंडी सुरू आहे. घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. रविवारी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने गर्डर वाहून नेणाऱ्या ‘पूलर’ या वाहनाला जुना टोलनाका येथे अपघात झाला. वाहन अतिअवजड असल्याने दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या एका पुलर वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे कार्य सुरू केले. सुमारे तीन तासानंतर हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. या मार्गावरून मध्यरात्री गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ‌अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. परंतु सकाळी १० नंतरही येथील वाहतूक कोंडी सुरळीत झाली नव्हती. येथील गायमुख घाट ते वाघबीळ येथील विजयनगरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे बोरीवली, वसई, विरार, मिरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे हाल होत आहेत. 000

 सामाजिक न्याय विभागाच्या निधीचे विकेंद्रीकरण होऊ देणार नाही

रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा     ठाणे :  राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्याविरोधात रिपाइं एकतावादीने रणशिंग फुंकले आहे. या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं एकतावादीने दिला आहे. रविवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादी या पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा नानासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली शास्री नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सामाजिक न्याय विभागाच्या निधी कपातीस विरोध करण्याचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. या मेळाव्यात  आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदींवर चर्चा करण्यात आली.  राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध, मातंग , चर्मकार समाजावर अन्याय – अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहेत.  त्याविरोधातही या बैठकीत  जनआंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी नानासाहेब इंदिसे यांनी, परदेशी शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये ५० टक्क्याने कपात करण्यात आली आहे. तसेच, अटीदेखील जाचक करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित विकासावर खर्च करण्याऐवजी इतरत्र वळविण्यात येत आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, मात्र, त्यांच्याकडून जर असे होणार असेल तर मागासवर्गीय समाजावर हा मोठा अन्याय आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. जर, त्यानंतरही जर निधी वर्ग करणे थांबविले नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा दिला. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष विकास निकम,  कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे, राष्ट्रीय युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे , राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हाद सोनावणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष,  कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते. 00000

 स्वच्छता कार्याचे पुणे पूरग्रस्तांकडून प्रशंसात्मक आभार

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने केलेल्या     नवी मुंबई : पुणे शहर व परिसरात अतिवृष्टीतील पूर परिस्थितीमुळे ओढवलेल्या अडचणीच्या स्थितीत पूर ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक धावून गेले आहे. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले आहेत. पुणे येथे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे 115 जणांचे पथक तयार केले व त्यांना 2 जेटींग मशीन व आवश्यक स्वच्छता साधनांसह शनिवारी सकाळी एनएमएमटीच्या 2 बसेसने पुण्याकडे रवाना केले. त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आपले सहकारी स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, नितीन महाले, नवनाथ ठोंबरे व विजय काळे यांच्यासह साफसफाई कामाचे नियोजन केले व सोबतच्या 2 स्वच्छता पर्यवेक्षक आणि 100 हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले. त्या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरही त्याठिकाणी फवारण्यात आली. या पथकाने ज्या आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केले त्याची प्रशंसा तेथील माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे तसेच त्या परिसरातील नागरिकांनी केलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच धावून गेली असून पुणे येथील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची तेथील नागरिकांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेकडूनही आभार व्यक्त करीत दखल घेण्यात आलेली आहे. 00000

अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध – मनीष सिंह

  रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ चे प्रकाशन       ठाणे : न्याय अडचणी सोडविण्यासाठी मी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध राहणार असल्याचे आश्वासन मुंबई मंडळाचे वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी मनीष सिंह यांनी दिले. रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ या त्रैमासिकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मनीष सिंह बोलत होते. ‘आजोबापासून मी रेल्वे परिवाराचा सदस्य असून माझे वडील, चुलते सुद्धा रेल्वे कर्मचारी होते. त्यामुळे समस्त रेल्वे परिवाराविषयी मला नितांत आदर असून पदाच्या माध्यमातून मला मिळालेल्या अधिकाराचा वापर कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिकाधिक कसा करता येईल यावर माझा कटाक्ष राहिला आहे. तुमच्या न्याय अडचणी सोडविण्यासाठी मी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध राहणार’, असे आश्वासन देऊन पुढे ते म्हणाले , ‘तुमच्या या मराठी भाषेतील ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’चे भविष्यात हिंदी व इंग्रजी भाषेत रूपांतरित होऊन ते अधिकाधिक रेल्वे पेन्शनर्स पर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरो.’ रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ या त्रैमासिकाचे प्रकाशन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, मुंबई मंडल मनीष सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी, २६ जुलै रोजी रेल्वे स्कुल कल्याण येथे शेकडो रेल्वे पेन्शनर्स॔च्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. याप्रसंगी मुंबई मंडळ मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ. महेंद्र गांगुर्डे, रेल्वेच्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती श्रीवास्तव, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री अतर सिंह, रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे झोनल अध्यक्ष एन. हरिदासन, झोनल महामंत्री आर. के. सारस्वत, उपाध्यक्ष अरविंद माने, कोषाध्यक्ष अनुप कुमार, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आनंदी व निरामय जीवनासाठी पेन्शनर्सनी आपल्या खाण्या -पिण्याच्या सवयित व जिवन जगण्याच्या शैलीत बदल करने अत्यंत आवश्यक आहे. उतारवयात अधिक खाणे टाळावे तसेच एकाच ठिकाणी तासनतास बसून रहाणे, अथवा झोपून रहाणे धोकादायक असून शरीराची सतत हालचाल चालू ठेवणे गरजेचे आहे. मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे, यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवल्यास आपण औषधांपासून अलिप्त राहू शकतो व स्वतःला आनंदी ठेऊ शकतो, असे मनोगत मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ महेंद्र गांगुर्डे यांनी व्यक्त केले.यावेळी रेल्वेच्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ज्योती श्रीवास्तव, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन चे राष्ट्रीय महामंत्री श्री अतर सिंह, कल्याण (प.) शाखेचे ज्येष्ठ अध्यक्ष एस के घुमरे, सिसोदिया आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन हरिदासन यांनी केले तर सूत्रसंचालन आर के सारस्वत यांनी केले व आभारप्रदर्शन अरविंद माने यांनी केले. 000

 ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे पत्रकार पाल्यांचा गुणगौरव

ठाणे : करिअर घडवतानाही छंद जोपसता येतात. मात्र त्यात गफलत करू नका. आपल्या पालकांनी मोठया कष्टाने तुम्हाला घडवले आहेत. त्यांची जाण ठेवत योग्य कार्यक्षेत्र निवडा. कार्यक्षेत्र कोणतेही निवडत असला तरी एकाग्रतेने परिश्रम करा, सोशल मिडीयाच्या मागे न धावता स्क्रीनटायमिंग कमी करा, खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यशाची ही गुरुकिल्ली पत्रकारांच्या पाल्यांना दिली. निमित्त होते दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव आयोजित केला जातो. कोव्हिड काळात बंद झालेला हा उपक्रम पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी पुन्हा सुरू केला आहे. शनिवारी ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दहावी शालंत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तनिष्का वाजपेयी, प्रांजली मोरे, ऋग्वेद घरत, उमैमा अन्सारी, सिद्धार्थ पांडे तर बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अथर्व गुंडे, कीर्ती कनोजिया, पद्मजा शिंदे, दुर्वा आचार्य, रिथिक्षा शेट्टी आदी विद्यार्थांचा सत्कार  खासदार नरेश म्हस्के, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, रोख रक्कम, पुस्तक आणि प्रमाणपत्र असे या गौरवाचा स्वरुप होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, पत्रकार दिवसभर बाहेर फिल्डवर बातमीच्या शोधात काम करत असतात. अनेक पत्रकारांचा संघर्ष आपण पाहिला आहे. त्यांच्या खडतर परिश्रमामुळे फलीत म्हणून तुमचा आज गुणगौरव होत आहे. त्यांचे हे कष्ट कधी विसरू नका. करिअर घडवताना उदरनिर्वाह होईल आणि ताठ मानेने समाजात जगता येईल असे क्षेत्र निवडा असे ते म्हणाले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही सोशल मिडीयाचा योग्य वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले. सर्व  क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनमधून जितके ज्ञान मिळवता येईल तितकेच घ्या, बाकी वापर टाळा असा सल्ला दिला. तसेच एकाग्र पद्धतीने परिश्रम घेतले तर स्वप्न नक्की पूर्ण होती ही यशाची गुरुकिल्ली दिली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर, सचिव निलेश पानमंद सह सचिव गणेश थोरात आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. पत्रकार संघाचे सदस्य अनुपमा गुंडे, अमर राजभर, सचिन देशमाने, अशोक गुप्ता, प्रफुल गांगुर्डे, पंकज रोडेकर आणि संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी यांनी केले. चौकट पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी ठाण्यातील पत्रकारांना योजनेतून जी घरे मिळाली होती. मात्र एका ना हरकत प्रमाणपत्रामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दूर केली. त्यामुळे या कार्यक्रमाचे औचित्य साधत पत्रकारांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ना हरकत प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या वैद्यकीय विम्याच्या नुतनीकरणाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्रेही यावेळी वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या रास्त मागण्या यापुढेही पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त राव यांनी दिले. तर पत्रकारांच्या विस्तारित कक्षासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी सुचना देत अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले. 0000

 रेल्वे स्वच्छतागृह कंत्राटदाराकडून मुतारीसाठीही पैसे वसुली

संजय वाघुलेंकडून रेल्वेकडे तक्रार     ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहातील कंत्राटदाराकडून दररोज हजारो प्रवाशांकडून मुतारीसाठी एक ते दोन रुपयांची आकारणी करून प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. मोफत असलेल्या सुविधा न देता कंत्राटदाराकडून हजारो रुपयांची वसूली केली जात आहे. या प्रकाराविरोधात भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असून, स्वच्छतागृहाबाहेर मुतारी मोफत असल्याची पत्रके लावली आहेत. ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये दररोज सुमारे साडेसहा लाखांहून अधिक प्रवाशांची वर्दळ आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. तर काही स्वच्छतागृहे पे अॅण्ड यूज तत्वावर आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये मुतारीचा वापर मोफत आहे. परंतु, स्वच्छतागृहांच्या बहुसंख्य कंत्राटदारांकडून प्रत्येक प्रवाशाकडून एक ते दोन रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांबाहेर रेल्वेची स्वच्छतागृहाची नियमावली असलेली पत्रके लावली. तसेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांकडून मुतारीसाठी पैसे न घेण्याचा इशारा दिला. या संदर्भात ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडेही तक्रार करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 00000

 जिल्ह्यातील ८ तलाव गाळमुक्त

२२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश       ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ या वर्षात मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी व कल्याण या पाच तालुक्यात पाझर तलाव व गाव तलावाचे एकूण ५० तलाव गाळमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून २०२४ पुर्वी जिल्ह्यातील एकूण ८ तलावातील गाळ २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या ८ तलावातील पाणीसाठा दोन कोटी २० लाख ५० हजार लिटरने वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ४२ गाव तलाव व पाझर तलावांची काम मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील ५, कल्याण तालुक्यातील २, शहापूर तालुक्यातील १ अशी एकूण ८ काय जून २०२४ पुर्वी  पूर्ण करण्यात आली आहेत. मागील वर्षी जून २०२३ पूर्वी १६ कामे पूर्ण करण्यात आली असून ३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या तलावांमध्ये ३ कोटी ६० लाख लिटर पाणीसाठा वाढला आहे- दिलीप जोकार, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद ठाणे  ग्रामीण भागातील पाच तालुक्यात ६५ सिंचन व पाझर तलाव आहेत. लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडील आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तलावाचे प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता १८ हजार ४०७ स.घ.मी. असून सद्यस्थिती उपलब्ध पाणीसाठा १६ हजार ४८०स.घ.मी. आहे. 0000

 झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन!

अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली!     मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन झालेले नाही. उलटपक्षी ज्या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्यात आली आहे, त्यानुसारच चटईक्षेत्रफळ वितरित करण्यात आले असून ते योग्य आहे, अशी भूमिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नगर विकास विभागाला लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचे कायदेशीर मत सोबत जोडले आहे. अशा १८ योजनांना पालिकेकडून याआधीच अभय मिळाले असले तरी भविष्यात अशा योजना मंजूर करावयाच्या किंवा नाही, याबाबत संदिग्धता असल्यामुळे अनेक योजना प्रतीक्षेत आहेत. झोपु योजनांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत ३३(१०) अशी तर झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी संक्रमण सदनिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्या नियमावलीत ३३(११) ही तरतूद आहे. यासाठी झोपु प्राधिकरण नियोजन यंत्रणा आहे. या दोन तरतुदी वगळल्या तर इतर सर्व तरतुदींसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण असून यापुढे झोपु प्राधिकरणाने ३३(१२)(ब) (रस्त्यावर असलेले अतिक्रमण वा अडथळे दूर करुन संबंधितांना सामावून घेणे) तसेच ३३(१९) (व्यावसायिक वापर केल्यास पाच इतके चटईक्षेत्रफळ) या तरतुदींसोबत झोपु योजना संलग्न करू नयेत तसेच संलग्न केलेल्या योजना रद्द कराव्यात, असे पत्र झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले होते. या पत्राबाबत झोपु प्राधिकरणाने नगरविकास विभागाला स्पष्टीकरण करून आपला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नगरविकास विभाग काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ३३(१२)(ब) अंतर्गत पाच तर ३३(१९) अंतर्गत १३ झोपु योजना आतापर्यंत मंजूर झाल्या आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. प्राधिकरणाने या पत्रात म्हटले आहे की, ३३ (९) म्हणजे समुह पुनर्विकास वगळता कुठल्याही तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतुद आहे. या तरतुदीसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. उर्वरित तरतुदींसाठी कुठेही महापालिका आयुक्त असा उल्लेख नाही. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आपल्या अधिकारात निर्णय घेऊ शकतात. ३३(१२)(ब) या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याचे पत्र महापालिकेनेच पहिल्यांदा दिले होते. आताही महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडूनच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत झोपु प्राधिकरणाने माजी न्यायमूर्ती भोसले यांचे मत घेतले असून त्यांनाही महापालिका आयुक्तांना असे करता येणार नाही. फार तर याबाबत राज्य शासनाकडे दाद मागावी, असे भोसले यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम – किशन जावळे

रायगड : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने ०१ जुलै २०२४ रोजीच्या…

२९ जुलैनंतर पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही – सोमनाथ घार्गे

रायगड : २९ जुलै २०२४ रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा पोलीस भरती…