अशोक गायकवाड रायगड : महसूल विभागामार्फत१ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच विविध योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत. शासननिर्णयानुसार सर्व तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. सप्ताहाच्या पूर्वतयारीची आढावाबैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, श्रीकांत गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, सहायक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ०१ ते ०७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहनिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ” ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, २ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, ३ ऑगस्ट रोजी ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, ५ ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, ६ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा” आणि ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 0000