कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद, प्रवाशांच्या त्रासात भर
उल्हासनगरः कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह, मुरबाड, अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भगडाद पडल्याने ती मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. तसेच पुलावर येणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक गोवेली – टिटवाळा – कल्याण आणि रायते – दहागाव – बदलापूर मार्गे वळवण्यात आली आहे. पूलावरील एकच मार्गिका सुरू असल्याने वाहनचालकांची मोठी कसरत होते आहे.
गेल्या काही वर्षात कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कल्याण शहर आणि उल्हासनगर शहराला तसेच शहाड गावठाण, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग या भागांना जोडण्यासाठी कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि विशेषतः शहाड पूल महत्वाचा आहे. अहमदनगर, पुणे जिल्ह्यातून येणारा शेतीमाल, भाजीपाला, दूध यासाठीही हा महामार्ग महत्वाचा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील शहाड येथील पूलाला मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना वाहनचालकांना करावा लागतो आहे. त्यातच बुधवारी याच शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर भगदाड पडले. त्यामुळे पुलावरून थेट खालच्या रस्त्याचा पृष्ठभाग दिसत होता. याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ठाणे उपविभागीय अभियंत्यांनी वाहतूक पोलिसांना पत्र देत हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्याची विनंती केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या पुलावरील अवजड वाहतूक थांबवली. त्यामुळे ही वाहने माघारी परतवण्यात आली. तर कल्याणकडे जाणारी मार्गिका बंद करून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर या पुलावरून कल्याणकडे जाणारी अवजड वाहतूक गोवेली – टिटवाळा – कल्याण मार्गे आणि रायते – दहागाव – बदलापूर मार्गे वळवण्यात आली.
महत्वाचा महामार्ग आणि पूलही
शहाड येथील कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या पुलाची गेल्या काही वर्षात मोठी वाताहत झाली. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडतात. त्याच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे येथून प्रवास करताना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पुलामुळे कल्याणशहरात न जात थेट कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्ग, भिवंडी शहर, ठाणे तसेच मुंबईकडे जाता येते. त्याचप्रमाणे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठीही हाच पुल फायद्याचा ठरतो. त्यामुळे या पुलाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत.
0000