नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सांघिक भावनेने चांगले काम केल्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेचे नाव सर्वत्र उंचावलेले आहे असे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या महापालिका कर्मचा-यांनी जडणघडणीत आपले योगदान दिले असे अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त होणे हे एक प्रकारे संस्थेचे नुकसान आहे असे मत व्यक्त केले. तथापि प्रत्येकाच्या जीवनात विहित वयोमानानुसार सेवानिवृत्ती अटळ असल्याने त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केल्या जाणा-या सेवानिवृत्ती सन्मान समारंभ हा निवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांच्या मनाला समाधान देणारा असून ही एक चांगली प्रथा नवी मुंबई महानगरपालिकेत आहे असे ते म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे – पाटील, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आणि अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. पंडीत जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. गणेश आघाव व श्रीम.उज्जवला पाटील, अधिक्षक / वसुली अधिकारी श्रीम.आशालता रासकर, सांख्यिकी अधिकारी श्री.विकास जाधव, सिस्टर इनचार्ज / नाईट सुपरवायझर श्रीम.मारीया रॉड्रीक्स, मिश्रक / औषध निर्माता श्री.प्रमोद पाटील, आरोग्य सहाय्यक श्री.माधव पाटील या सेवानिवृत होणाऱ्या तसेच कार्यकारी अभियंता श्री. विजय राऊत या स्वेच्छानिवृत्त होणा-या आधिकारी, कर्मचारी यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रशासन विभागा उपायुक्त श्री.शरद पवार, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, विधी अधिकारी श्री.अभय जाधव यांची समयोचित शुभेच्छापर भाषणे झाली. बाल रोग तज्ज्ञ डॉ. पंडीत जाधव आणि प्रशासकीय अधिकारी श्री. गणेश आघाव यांनी सत्कारमूर्तींच्या वतीने प्रतिनिधिक स्वरुपात सत्काराला उत्तर दिले.