उमेश पाटील
मुंबई : हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून त्यांची गाडी फोडली. सर्वसामान्य नागरिकांवर असा प्रसंग यायला नको परंतु विधीमंडळाच्या सदस्याच्याबाबतीत असा प्रसंग येत असेल तर ही चिंतनीय बाब असून या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणार्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना मुख्य आरोपी करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
या हल्ल्यातील आरोपी जय मालोकर या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूला राज ठाकरे जबाबदार आहेत असा आरोपही उमेश पाटील यांनी यावेळी केला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘राडा संस्कृती’ निर्माण केली आहे त्यामुळे तरुणपिढी बेरोजगारीकडे जास्त झुकली आहे. या सर्व प्रकाराला आणि तरुणांची बेरोजगार फौज तयार करण्याला राज ठाकरे जबाबदार आहेत असेही उमेश पाटील यावेळी म्हणाले.
राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने संतप्त मनसे सैनिकाने आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मात्र त्यानंतर त्या तरुणाचा जीव गेला. आपल्या एका कार्यकर्त्यांला जीव गमवावा लागला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांना अक्कल येत नाही उलट आमदार अमोल मिटकरी यांना कुत्र्यासारखं मारण्याची भाषा करत आहेत. राज ठाकरे यांच्या घरात कुत्रा होता त्याला ते मारत असल्याने त्या कुत्र्याने घरातील व्यक्तीचा चावा घेतला असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रात जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्याही तुमच्या कार्यकर्त्याची नाही असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.
एका कार्यकर्त्यांला हल्ला करायला प्रवृत्त करणे आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू होणे हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. कायदा हा सर्वांना सारखा आहे त्यामुळे राज ठाकरे यांना कायदा वेगळा नाही त्यामुळे तसा गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेश पाटील यांनी केली.
पूजा खेडकर या सनदी अधिकाऱ्यांने बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन आयएएसची नोकरी मिळवली हे महाराष्ट्रातील तरुणांसमोर जे चित्र गेले आहे ते योग्य नाही असेही उमेश पाटील म्हणाले.
एमपीएससीसारखी स्वायत्त संस्था असून त्यांची विश्वासार्हता या देशात आहे. मात्र पूजा खेडकरच्या बोगस प्रमाणपत्रामुळे या संस्थेचे नाव खराब झाले आहे. नाशिकच्या जिल्हा परिषदेत बोगस अधिकारी सापडले आहेत. सोलापूर जिल्हयातही असाच प्रकार समोर आला होता हेही उमेश पाटील यांनी सांगितले.
राज्यभरातील वर्ग एक ते चारपर्यंतच्या सर्व शासकीय -निमशासकीय कर्मचाऱ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे त्या सर्वांची पुढील वर्षभरातील सरसकट फेरतपासणी करुन त्यांचे अपंगत्व खरंच आहे का हे आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तपासले पाहिजे अशी मागणी उमेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना फिरता रंगमंच अशी टीका केली होती. संजय राऊत तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे असा सवाल करतानाच संपादक असलेल्या संजय राऊत यांच्याकडील शाब्दिक बाण संपले असल्याने आता त्यांच्याकडे फक्त फुसके बाण राहिल्याने असे तर्कहीन शब्द वापरत आहेत असेही उमेश पाटील म्हणाले.
०००