अनिल ठाणेकर
ठाणे : स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा राग येऊन स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.
स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी विशालगड प्रकरणी दंगल घडविण्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. संभाजीराजे छत्रपती यांच्यावरील आमदार आव्हाड यांच्या वक्तव्याचा राग येऊन स्वराज्य संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी हल्ला केला होता.आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात विवियाना माॅलसमोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हायवेवर रास्ता अडविण्यात आला तर मुंब्र्यात अमृतनगर येथे ठाणे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ला प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या ना. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. तर याप्रकरणी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, विशालगड प्रकरणी दंगल घडविण्याचा केलेल्या आरोपाचा पुनरुच्चार केला असून आपली लढाई ही विचारांची असून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वासाठी समजोता करणार नाही आणि अशा भ्याड हल्ल्याला आपण घाबरत नाही.
००००