कल्याण : कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला आहे. सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस या घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं आहे.
कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. कल्याण पश्चिम भागात असलेला सहजानंद चौक हा अत्यंत गजबजलेला आणि रहदारीचा भाग आहे. या रस्त्यावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. या रस्त्याच्या एका बाजूला अनेक दुकानं तर दुसऱ्या बाजूला एक रुग्णालय आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वर्दळ फारशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली
कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या सहजानंद चौकात शुक्रवारी सकाळी एक भव्य होर्डिंग कोसळून तीन पादचारी किरकोळ जखमी झाले. तर एका वाहनाचे नुकसान झाले आहे. होर्डिंग कोसळताना सुदैवाना त्या भागात पादचारी, वाहनांची वर्दळ कमी होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे परिसरातील व्यापाऱ्यांनी सांगितलं.कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. होर्डिंग कोसळल्यानंतर काही वेळ या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. २० बाय १५ फूट आकाराच्या या होर्डिंगचा आधार सांगाडा लाकडाचा होता. गेल्या महिनाभर मुसळधार पाऊस पडत असल्याने या होर्डिंगच्या लाकडी आधाराचा सांगाडा सैल होऊन ते कोसळलं असण्याची शक्यता जाहिरात क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर फक्त कारवाईचं नाटक झालं
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली पालिकेने सुरूवातीला शासन आदेशाप्रमाणे मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील, बेकायदा होर्डिंग, त्यांचे लोखंडी सांगाडे काढून टाकले. सुरूवातीचे पंधरा दिवस हे नाटक पालिकेकडून करण्यात आले. त्यानंतर बेकायदा होर्डिंग काढण्याची मोहीम थंडावली. सहजानंद चौकातील होर्डिंग कोसळण्यामागे पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
होर्डिंगमागे राजकीय मंडळींचा आशीर्वाद?
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी होर्डिंग ही ठाण्यातील काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने अनेक वर्ष लावली जात आहेत. या होर्डिंगवर कारवाई न करण्याचे अलिखित संकेत वरिष्ठांना आहेत. त्यामुळे पालिका अधिकारी माहिती असूनही अशा बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी जात नसल्याचीही माहिती समोर आली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त आदेश देतात. त्यामुळे कनिष्ठ अधिकारी आदेशाचे पालन करून गप्प बसतात. आपल्या आदेशाचे कठोर पालन होते की नाही याची चाचपणी वरिष्ठ करत नसल्याची माहिती आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकूण सुमारे ४०० हून अधिक बेकायदा होर्डिंग आहेत. या होर्डिंगच्या माध्यमातून पालिकेचा सुमारे ४५० कोटीहून अधिकचा महसूल बुडत आहे. याविषयी काही जाणकारांनी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नसल्याचे तक्रारदाराने सांगितलं.
00000
