ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता महत्वपूर्ण बैठक होत आहे. भाजपाचे पालघर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून प्रमुख मार्गदर्शन केले जाईल. या बैठकीला १००० हून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी येथे दिली.
भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकुर यांचीही बैठकीला उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत पुणे येथे पार पडलेल्या प्रदेश अधिवेशनातील ठरावांना अनुमोदन दिले जाईल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव केला जाणार आहे. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक व महापालिकेच्या निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत नव मतदार नोंदणी अभियान व पक्षाच्या इतर कार्यक्रमांबाबतही चर्चा होईल, असे श्री. वाघुले यांनी सांगितले. या महत्वपूर्ण बैठकीला भाजपाचे ठाणे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध मोर्चांचे संयोजक व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकारिणी, विविध प्रकोष्टचे संयोजक, प्रभाग अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष आदींसह पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती राहील. ठाणे शहरातील पाच विधानसभा क्षेत्राबाबत चर्चा होणार असल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्सूकता आहे. दरम्यान, या बैठकीनंतर जिल्ह्यातील १२ मंडलांच्या विस्तारित कार्यकारिणीचीही बैठक होईल.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *