ठाणे : दिवा पुर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुल उभारणीच्या कामामध्ये बहुमजली इमारती, उच्च दाब विद्युतवाहिन्या आणि भुसंपादनचा अडथळा निर्माण झाल्याने काम रखडले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने पुलाच्या कामाचा आरखड्यात काही बदल करत सुधारित आराखडा तयार केला असून या आखड्यास प्रशासकीय सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्याने दिवा रेल्वे उड्डाण पुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाण पुल नसल्यामुळे नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडतात. यामुळे रेल्वे अपघातात नागरिकांना प्राण गमवावे लागतात. असे अपघात टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाने रेल्वे उड्डाण पुल उभारणीचा निर्णय काही वर्षांपुर्वी घेतला होता. या प्रकल्पाच्या प्रस्तावस २०१८ मध्ये सर्वसाधरण सभेने मान्यता दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरवात झाली. या पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील बांधकाम रेल्वेकडून तर, महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याचे बांधकाम ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहेत. परंतु या उड्डाणपुलाच्या मार्गात बहुमजली इमारती, उच्च दाब विद्युतवाहिन्या आणि भुसंपादनचा अडथळा निर्माण झाला असून यामुळे गेल्या काही वर्षांपासून पुलाच्या उभारणीचे काम रखडले आहे.
पुलाच्या कामास होणारा विलंब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पुलाचा आराखडा बदलण्याचा निर्णय काही महिन्यांपुर्वी घेतला होता. यानुसार पालिकेने सुधारीत आराखडा तयार केला असून या आराखड्यामुळे प्रकल्प खर्चात ३.७७ कोटींची बचत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
असा आहे सुधारीत आराखडा
रेल्वे रुळावरील पुलाच्या भागात रेल्वेने दोन्ही बाजूस प्रत्येकी १.५० मीटर रुंदीचा पदपथ ठेवला आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीबाहेरील जोडरस्त्यावरील पुलावर सुध्दा २.५० मीटर रुंदी ऐवजी १.५० मीटर रुंदीचा पदपथ सुधारीत आराखड्यात ठेवण्यात आला आहे. पश्चिम बाजूस रस्त्याची विकास आराखड्यानुसार रुंदी २० मीटर इतकी आहे. त्यामुळे पुलाच्या जोडरस्त्याची रुंदी १४.५० मीटर ऐवजी ८.५० मीटर करणे आवश्यक आहे. तसेच पश्चिम बाजूस विकास आराखड्यानुसार रस्त्याची पुरेशी रुंदी नसल्याने पुलावर पदपथ करण्याऐवजी केवळ वाहनांकरीता पुल बांधणे संयुक्तीक होणार आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस जमीन पातळीवर प्रत्येकी ४.५० मीटर रुंदीप्रमाणे जोड रस्ता उपलब्ध होणार आहे.
तसेच नागरिकांच्या विरोध लक्षात घेऊन पश्चिम बाजूकडील बहुमजली इमारत आणि गावदेवी मंदीर भागातील रस्त्याच्या आरेखनामध्ये बदल करण्यात येणार आहे. पूर्व बाजूकडील जोडरस्त्याची रुंदी १४.५० मीटर ऐवजी १२.५० मीटर केल्याने तसेच जोडरस्त्याच्या रॅम्प या भागातील पदपथ कमी केल्याने पुलाचे दोन्ही बाजूस जोड रस्त्याची रुंदी जास्त उपलब्ध होणार आहे, असे बदल सुधारीत आराखड्यात करण्यात आले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *