नवी मुंबई- सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराच्या डासांकरिता पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणखी ठोस उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या सर्व 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस असूनही या शिबीरांना सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व आरोग्य विभाग प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात 24 ठिकाणी या विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आली होते. या शिबीरांना 8053 नागरीकांनी भेट दिली असून त्यांना हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली तसेच 1025 रक्त नमुने तपासणी करण्यात आले. यावेळी जनजागृतीकरिता हस्तपत्रके व पोस्टर्स यांचेही वाटप करण्यात आले.
या शिबिरांच्या ठिकाणी घरांतर्गत व घराभोवतालची प्रत्यक्ष डासअळी स्थाने जसे की, फुटलेली भांडी, कुंडीखालील ट्रे, फुटलेल्या बाटल्या, फेंगशुईचे पॉट्स, फ्रीज ड्रिफ्रॉस्ट ट्रे, टायर्स असे प्रत्यक्ष साहित्य व मॉडेल्स दाखवून नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांच्या आळ्या व घरांतर्गत व घराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये डासोत्पत्ती स्थाने कशी होतात ते प्रत्यक्षात दाखविण्यात आले.
याशिवाय शिबिरांमध्ये साथरोग / जलजन्य आजारांबाबत देखील जनजागृती करण्यात आली. यामध्ये महत्वाचे म्हणजे उघड्यावरचे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व शौचानंतर हात स्वच्छ धुणे, भाजीपाला धुवून वापरणे, पिण्याचे पाणी गाळून व उकळून पिणे, अतिसार झाल्यास क्षारसंजीवनी मिश्रणाचा वापर करणे याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.
सोमवार, 5 ऑगस्टला अशाच प्रकारे आणखी वेगळ्या 24 ठिकाणी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात अशाच प्रकारचे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी आपल्या घरात व परिसरात पाणी साचून डासोत्पत्ती स्थाने तयार होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी अथवा ताप आल्यास तपासणी व औषधोपचाराकरिता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयाशी किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *