ठाणे : गेल्या १५ वर्षात मुंब्रा प्रचंड प्रमाणात विकास झाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा आज इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे. तरीही, काही ठराविक लोकांकडून मुंब्र्याला बदनाम केले जात आहे. या बदनामीविरोधात मुंब्रा – कौसा परिसरातील युवक एकवटले असून ही बदनामी आम्ही सहन करणार नसून त्याविरोधात आम्ही अभियान राबविणार आहोत, असे मुंब्रा येथील हिंदू, मुस्लिम, दलित आदी सर्वधर्मीय युवक- युवतींनी जाहीर केले.
मुंब्रा – कौसा भागाला दहशतवादी म्हणत असल्याची टीका सध्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ही टीका केवळ द्वेष पुरविण्यासाठी केली जात आहेत, असा आरोप करीत मुंब्रा येथील सर्वधर्मीय उच्चशिक्षित तरूणांनी पत्रकार परिषद घेऊन मुंब्र्याची बदनामी थांबवावी, असे आवाहन केले. यावेळी मर्जिया पठाण, सबा सोलकर,दिव्यात सोनकांबळे, रोहीत सिंह,किशोर कांबळे आदी उपस्थित होते. मर्जिया पठाण यांनी सांगितले की, १५ वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांचा आधार घेऊन मुंब्र्याला बदनाम केले जात आहे. गेल्या १५ वर्षात मुंब्रा येथे कोणत्या प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होईल, अशी घटना घडली आहे का? मुंब्रा येथील जनता शिव-शाहू-फुले-आंबेडकर- मौ. अबूल कलाम आझाद यांची विचारधारा मानणारी आहे. ईद ए मिलाद आणि गणेशोत्सव एकत्र साजरा करणारा येथील समाज आहे. आज येथील तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. नीट, जेईई सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत. अन् हे यश केवळ डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकासकामांमुळेच झाले आहे. मी स्वतः या आधी मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला होता. बादली भरून दोन दोन मजले पाणी चढविले होते. मात्र, डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे आज आम्ही 24 तास प्रकाशात राहत आहोत शिवाय, पाण्याची व्यवस्थाही पूर्ण झाली आहे. ज्या मुंब्र्यात कधी रस्ते नव्हते; तिथे सुसज्ज रस्ते बनले आहेत. ही सर्व प्रगती पहायची असेल तर माझ्यासोबत मुंब्र्यात चला. मुंब्र्यातील सामाजिक एकोपाही मी तुम्हाला दाखवते, असेही मर्जिया पठाण यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सबा सोलकर हिने, ज्या मुंब्र्याचा शैक्षणिक आलेख तळाला गेला होता. तो आता प्रचंड उंचावला आहे. त्यामुळे माझ्यासारखी एक सामान्य मुस्लीम घरातील मुलगी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. जर मुंब्र्यात दहशतवादी कारवाया होत असत्या तर होऊ शकले असते का? असा प्रश्न विचारून, आजचा मुंब्रा हा प्रचंड प्रगत आहे. आज इतर शहरांच्या तुलनेत अवघ्या 15 वर्षात विकसित झालेले मुंब्रा हे सबंध महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे, असे सांगितले. किशोर कांबळे या तरूणाने सांगितले की, माझे वय 35 वर्षे आहे. माझ्या तीन पिढ्या मुंब्र्यात गेल्या आहेत. माझे आजोबा येथे राहण्यास आले होते. तेव्हा कधीच असा प्रचार , प्रसार कोणी केला नव्हता. पण, आताच असे का करीत आहेत, हे कळायला मार्ग नाही. मुंब्र्यात आजवर कधीच जातीय दंगा झालेला नाही. मात्र, अशा पद्धतीने बदनामी होत असल्याने आज मुंब्र्यातील मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाही अन् येथील मुलींचे विवाह होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृपया, मुंब्र्याची बदनामी करू नका, असे आवाहन केले. रोहित सिंह या तरूणाने, मी अनेक वर्षांपासून मुंब्र्यात वास्तव्यास आहे. पण, कधीच धार्मिक तणाव पाहिलेला नाही. आमचा विकास गेल्या १५ वर्षात वेगवान पद्धतीने झालेला आहे. ज्या पद्धतीने येथील तरूण शिक्षण घेत आहेत. त्याकडे पाहिल्यास विकासाची प्रचिती येते. पण, मुंब्र्याची केली जाणारी बदनामी म्हणजे युवकांची बदनामी आहे. अन् ही बदनामी थांबविण्यासाठी आम्ही अभियान सुरू करणार आहोत, असे सांगितले.
०००००
