पंतप्रधान शेख हसीनांचे देशातून पलायन
पंतप्रधानांच्या निवासस्थानात लुटपाट, जाळपोळ
तीनशेहून अधिक नागरिक ठार, हजारो जखमी
भारतीय सीमेवर अलर्ट जारी
ढाका : बांगलादेशात यादवी माजली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलना आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नागरिक इतके संतप्त होते की त्यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या घरावर चाल केली. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केलेय. शेख हसीना या भारतामार्गे लंडनला रवाना होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. पंतप्रधांनानी देशातून पलायन केल्यामुळे बांग्लादेशी लष्कराने सत्ता ताब्यात घेतली असून ते आता देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहेत.
बांग्लादेश हे भारताचे मित्रराष्ट्र असून शेख हसीना यांचे सरकार भारतधार्जिने असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. २००९ पासून शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या.
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.
बांग्लादेशातील आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आणि त्यामध्ये 300 आंदोलकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर ढाक्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पोलिसांकडून देशात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली.
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढच्या ४८ अंतरिम सरकार स्थापन करण्यात येईल असं लष्कर प्रमुख वकार-उर-झमान यांनी सांगितलं. बांग्लादेशातील कर्फ्यु हटवण्यात आला असून हिंसाचार आटोक्यात आणण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे.
शेजारच्या बांग्लादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा परिणाम भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो. भारतात इस्लामी दहशतवादी सक्रिय होऊ शकतात अशी चिंता व्यक्त करण्यात येतेय. बांगलादेशमधील ताज्या घडामोडी लक्षात घेता सीमा सुरक्षा दलाने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बांगलादेशातील हिंसाचारासंदर्भात भारताकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये, बांगलादेशचा प्रवास टाळावा अशा नव्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. बांग्लादेशमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी तीन आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
या आधी पाकिस्तान, श्रीलंकेमध्ये हिंचारार उफाळला होता, आता बांग्लादेशमध्येही तशीच परिस्थिती आहे. बांग्लादेशमध्ये निर्माण झालेली ही स्थिती संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे बांग्लादेशात शक्य तितक्या लवकर लोकशाही सरकार स्थापन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
