मुख्य आरोपींना अटक; तीन जण फरार – पो. नि. बाळासाहेब खाडे
अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख याने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी देत दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुपारी घेतलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य तीन जण फरार आहेत. तसेच सरपंच जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख दोघे फरार असून पोलिस शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलिस उपनिरीक्षक लिंगप्पा सरग व आठ पोलिस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.
२५ जूनला अनिल देशमुख व त्यांचे सहकारी रोहित मोहिते कारने नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना काही जणांनी माहिती विचारण्याचा बहाणा करून गाडी थांबविली. त्यानंतर जमावाने लोखंडी रॉडच्या सहाय्याने दोघांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून घडल्याची फिर्याद अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानुसार कर्जत पोलिस ठाण्यात जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख, गजानन देशमुख, योगेश देशमुख, विवेक देशमुख, श्रीराम देशमुख, सचिन देशमुख व इतर पाच अनोळखी इसमांविरोधात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कर्जत पोलिस ठाणे करीत असताना तपासा दरम्यान आरोपी योगेश देशमुख याला २५ जूनला अटक केली. परंतु, गुन्ह्यातील इतर पाच अनोळखी आरोपींबाबत काहीही माहिती प्राप्त होत नव्हती. त्याच दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयेंद्र देशमुख याने कट करून पाच जणांना पैशाचे आमिष दाखवून त्यांनीच हा गुन्हा केल्याचे कबूल करण्यास सांगितले. त्यानुसार पाच जणांनी कर्जत पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. परंतु, पोलिसांना संशय आल्याने सखोल विचारपूस केली असता, कबुली केलेले गुन्ह्यातील खरे आरोपी नसून आरोपी जयेंद्र देशमुख याने पैशाचे व नोकरीचे आमिष दाखवून गुन्हा अंगावर घेण्यासाठी पाठवून दिल्याचे कबुल केले. हा गुन्हा क्लीष्ट, गुंतागुतीचा व व्याप्ती मोठी असल्याने त्यानंतर पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देवून व मार्गदर्शन करून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड हे करतील, असे आदेश दिले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलिस उपनिरीक्षक लिंगप्पा सरग व आठ पोलिस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तसेच सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे अनोळखी आरोपी कल्याणमधील म्हारळ येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत तात्काळ हालचाली करून म्हारळ कल्याण येथून २ ऑगस्टला शुभम राजेंद्र कांगणे (वय २६), नंदेश मिलिंद खताते (वय २२) ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता, त्यांनी पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख, प्रशांत
देशमुख यांच्या सांगण्यावरून साथीदार राजेश सिंग, नितेश सिंग, बंटी कांबळे (सर्व रा. म्हारळगाव, ता. कल्याण) यांनी आपसात संगनमत करून हा गुन्हा केला असल्याचे सांगितले. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी मोटार कार जप्त करण्यात आलेली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इतर तीन अनोळखी आरोपी तसेच मुख्य आरोपी जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख दोघे फरार असून पोलिस शोध सुरु आहे.गुन्ह्यात नावे असलेली एकूण सात आरोपी प्रत्यक्षात मारण्यासाठी नव्हते, असे पोलिस तपासात आढळले आहे. त्यापैकी योगेश वसंत देशमुख यास तपासा दरम्यान अटक करण्यात आली आहे. तो सत्र न्यायालयाच्या आदेशाने सध्या जामिनावर मुक्त आहे. उरलेले सहा आरोपींपैकी चार आरोपी गजानन बाळाराम देशमुख, विवेक विश्वनाथ देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, सचिन गजानन देशमुख यांना पनवेल सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तर आरोपी जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्यांनी आता उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. प्रत्यक्ष मारण्यासाठी पाच अनोळखी आरोपींपैकी शुभम राजेंद्र कांगणे, नंदेश मिलिंद खताते यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. शुभम कांगणे याच्याविरोधात कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल आहेत. उर्वरित आरोपी राजेश सिंग, नितेश सिंग, बंटी कांबळे यांचा शोध सुरु आहे.
