ठाणे : गेले दोन महिने चरईतील काही भाग तसेच भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी, तबेला भाग येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा खूपच अनियमित व कमी दाबाने होत असल्याने स्थानिक नागरिकांची खूपच परवड होत आहे. याबाबत ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केले,वारंवार तक्रार केली, परंतु यातून काहीच मार्ग निघत नसल्याने स्थानिक रहिवाशांना घेऊन मा.नगरसेविका प्रतिभा मढवी व भाजपा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी थेट महापालिका पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी पाणीपुरवठा उपअभियंता छोटेलाल गवळी यांच्याकडे तक्रार मांडण्यात आली. त्यावर चर्चेअंती त्यांनी नळ जोडणी पाइप तपासणी,दुरुस्ती तसेच नवीन जोडणी याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटून सर्वांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याबाबत समस्त रहिवाश्यांनी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे आभार व्यक्त केले.
००००००
