नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑगस्टला होणार आहे. आज सुप्रीम कोर्टाने निश्चित केल्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुनावणी वेगवेगळी होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या 3 सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीवेळी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. सुनावणीला तारखा मिळत असल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही, असं दिसतंय. न्यायव्यवस्था तराजू घेऊन उभी आहे, पण तिच्यातून न्याय मिळत नसेल तर हे खेदजनक आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. अजित पवारांना यातून पळ काढायचा असल्याची टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
या सुनावणी आधी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होईल असे ठाकरे गटाच्या वकीलांनी सांगितले आहे. पक्ष ठाकरेंना मिळेल आणि चिन्ह गोठवले जाईल असे ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी सांगीतले. दरम्यान दिल्लीतील या सुनावणीसाठी उध्दव ठाकरे खास दिल्लीला गेले होते.
