नवी मुंबईत स्वच्छतेचा नामगजर
मुंबई : नवी मुंबईची ओळख संपूर्ण देशभरात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून केली जात असून स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लहान वयापासूनच रुजावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
अशाच प्रकारचा ‘आंतरशालेय दिंडी स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राबविण्यात येत असून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 46 शाळांनी व खाजगी 45 शाळांनी अशाप्रकारे एकूण 91 शाळांतील 4 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी होत यशस्वी केला.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावर ‘स्वच्छता दिंडी’ आयोजित करुन त्याची गुगल लोकेशन नमूद असलेली छायाचित्रे स्वच्छता दिंडी स्पर्धेचा अर्ज भरताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोशल मिडीया हँडलला टॅग करुन सादर करावयाची होती. त्यानुसार 46 महानगरपालिकेच्या व 45 खाजगी अशा 91 शाळांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्याकरिता या 91 शाळांनी आपापल्या परिसरात स्वच्छता दिंडी आयोजित केल्याने त्या शाळांच्या संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा जागर झाला.
या 91 शाळांची प्राथमिक फेरी दि. 5 व 6 ऑगस्ट 2024 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे रंगीत तालीम स्वरुपात विना रंगभूषा व वेशभूषा पार पडली. यामध्ये शाळांनी ‘स्वच्छता’ विषयांतर्गत – (1) कचऱ्याचे विलगीकरण, (2) सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, (3) खारफुटीचे (Mangrove) संवर्धन, (4) जलस्त्रोत (वॉटरबॉडी) स्वच्छ्ता आणि संवर्धन, (5) माझी वसुंधरा उपक्रम, (6) नवी मुंबई शहर सुशोभिकरण अशा सहा मुद्दयांना अनुसरून 7 मिनीटात दमदार सादरीकरण केले. यामध्ये भजन, कीर्तन, पोवाडा, भारूड, वारीतील रिंगण, वारीतील विशिष्ट नृत्य, सामाजिक संदेश देणारा अन्य सांस्कृतिक कलाप्रकार अशा विविध प्रकारे शाळांनी आपले सादरीकरण केले.
प्राथमिक फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द नाटय व मालिका कलावंत श्री.कुणाल मेश्राम करीत असून प्राथमिक फेरीतून निवडक 25 शाळांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे.
स्वच्छता दिंडी स्पर्धेची अंतिम फेरी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे रंगभूषा व वेशभूषेसह 8 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून पारितोषिक वितरण समारंभ अंतिम फेरीच्या सादरीकरणानंतर सायं. 4 वाजता संपन्न होणार आहे.
स्वच्छता दिंडी स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकाविणा-या शाळेस रू. 25 हजार तसेच व्दितीय क्रमांकाच्या शाळेस रू. 20 हजार व तृतीय क्रमांकाच्या शाळेस रू. 15 हजार रक्कमेची पारितेषिके सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच रू. 5 हजार रक्कमेची 2 उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. याशिवाय दिंडी सजावटीस विशेष पारितोषिक असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असते. या माध्यमातून मुलांच्या व युवकांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे.
‘स्वच्छता दिंडी स्पर्धा’ हा देखील कलात्मक सादरीकरणासाठी आणि स्वच्छता विषयक जाणिवा उंचावण्यासाठी अत्यंत महत्वाचा व नाविन्यपूर्ण उपक्रम असून या माध्यमातून लोकसंस्कृतीची जपणूकही होणार आहे. तरी सर्वांनी स्वच्छता दिंडी स्पर्धा अंतिम फेरीचे सकाळी 11 पासून सुरू होणारे सादरीकरण पाहण्यास तसेच त्यानंतर होणा-या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
