येणाऱ्या निवडणुकांची चाहूल दररोज गडद होते आहे. आता राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरात तयारी सुरु केली आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी श.प. या दोन्ही पक्षांनी राज्यभरात यात्रा, सभा घेण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः उठून दिल्लीला गेले आहेत. या आधी त्यांच्या राष्ट्रीय मित्र पक्षाचे, म्हणजेच भजापाचे बडे नेते, मातोश्री येथे येऊन ठाकरेंशी बोलणी करत असत. मागील विधानसभा लोकसभां धी 2029 मध्ये, अमित शहा हे स्वतः मातोश्रीवर गेले व तेंव्हा बंद दरवाजा आड जे काही झाले, त्याचे धिंडवडे आजुनही जाहीर सभामध्ये निघच आहेत. राज्यात भाजपाची तीस वर्षांची साथ सोडून ठाकरेंनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले तेंव्हापासून चर्चा व बैठकांसाठी ठाकरेंनी बांद्र्यातून बाहेर पडण्याची प्रथा सुरु झाली. शरद पवारांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी उद्धव ठाकरे अनेकदा व कधी कधी अचानकही दाखल होतात, बैठका करतात. सध्या ते सोनिया गांधी, खर्गे व राहुल यांच्या भेटीसाठी दिल्ल्तीत गेले आहेत. ठाकरेंच्या महत्तेचा तो जुना इतिहास आता पुसला जातो आहे. आघाडीत या हालचाली होत असताना इकडे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षानेही अशाच प्रचारयात्रांची सुरुवात केलेली असून भारतीय जनता पक्ष विभागनिहाय आमदारांच्या बैठका घेतो आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांचेही दौरे मेळावे सुरु झालेले आहेत. हे होत असतानाच दुसरीकडे जागा वाटपाच्या चर्चाही जोरदारपणाने रंगू लागल्या आहेत. काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरून हरयाणा, छत्तीसगड व महाराष्ट्र या निवडणूकप्रवण राज्यांतील उमेदवार ठरवण्यासाठी समित्यंची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी उमेदवार निवडण्याची जबाबदारी मध्यप्रदेशातील जुने काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे देण्यात आली असून त्यांच्या सोबत दाक्षिणात्य नेत्यांची एक टीम काम करणार आहे. महाराष्ट्रात काँग्रसेच्या दोन प्रांतिक समित्या असतात. मुंबई काँग्रेस ही थेट केंद्रीय महासमितीशी बांधील स्वतंत्र समिती असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ही राज्यस्तरावरील दुसरी प्रांतिक समिती आहे. नाना पटोले हे राज्याचे तर वर्षाताई गायकवाड या मुंबईच्या प्रांताध्यक्ष असून या दोघांनीही आपल्याला कोणत्या जागा लढायच्या आहेत किंवा आपल्या समितीचा दावा कोणत्या जागांवर आहे याची चर्चा सुरु केलेली आहे. नाना पटोलेंच्या समवेत विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेते काम करत आहेत. तर वर्षाताईं समवेत नसीम खान आदि मंडळी काम करत आहेत. यांच्या अनेक बैठका दिल्लीत आणि मुंबईत पार पडल्या आहेत आणि त्या आधारे काँग्रेस साधारणतः राज्यातील 120 जागांवर दावा ठोकणार आहे. त्याच वेळी संजय राऊत आणि उबाठाचे अन्य नेते सांगत आहेत की ते दीडेश पेक्षा अधिक जागा लढणार आहेत. तिकडे शरद पवारांतर्फे कोणीच जागांची संख्या सांगत नसले तरी जितक्या जागा मागील वेळी म्हणजेच 2019 ला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना जिंकल्या होत्या त्याहून अधिक जागांची मागणी शरद पवार नक्की करणार आहेत. हे सारे गणित पाहता काँग्रेस आणि उबाठाला आपापले जागांवरचे दावे कमी करावे लागणार, हे उघडच आहे. तिकडे महायुतीमध्ये काही वेगळी स्थिती नाही. अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ यांनी किमान सत्तर ते ऐशी जागा आपल्याला लढवाव्याच लागतील अशी भाषा आधीच केलेली आहे. एकनाथ शिंदेंचे सहकारी सांगत आहेत की किमान शंभर जागा त्यांना लढण्यासाठी मिळवाव्याच लागतील. या दोघांपेक्षा, किंवा खरेतर राज्यातील अन्य सर्व पक्षां पेक्षाही भारतीय जनता पक्षाचा आकार बराच मोठा आहे. उबाठा व शरद पवार यांनी दोघांनी मिळून 2019 च्या निवडणुकीत जितक्या जागा जिकंल्या होत्या त्या पेक्षा थोड्या अधिकच जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यांची विधानसभेतील सध्याची संख्या 112 आहे. त्यात कमळ चिन्हावर निवडून आलेले 105 आहेत, तर विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षासह काही अपक्ष आमदार हे सुरुवातीपासूनच भाजपा सोबत राहिले आहेत. ते पाहता आणि मागील 2019 मध्ये ज्या जागी भाजपाला अगदी थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता, त्या पाहता, भाजपाची किमान जागांची मागणी ही 160 च्या आसपास रहणार हेही उघडच आहे. त्यामुळे याही बाजूला गोंधळ आणि त्याही बाजूला गोंधळ अशी एकंदरित स्थिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी परवाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वातील सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी महायुतीला महाराष्ट्रात बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला होता. त्यामुळे मनसे हा महायुतीतील चौथा भिडु राहणार असे स्रावंनी गृहीतच धरले होते. पण राज ठाकरे यांनी तो गैरसमज दूर केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या धोरणात बदल झाला असेही म्हणता येईल. पण त्यांनी जाहीर केले की मी लोकसभेला पाठिंबा दिला होता. विधानसबेचे मी तेंव्हाही काहीच बोललो नव्हतो. माझ्या पक्षाची ताकद वाढते आहे. आम्ही या वेळी विधानसभेला दोनसे पन्नास पर्यंत उमेदवार उभे करणार आहोत. 2009 व 2014 ला राज ठाकरे यांनी अशाच पद्धतीने दोनशेहून अधिक जागा लढवल्या होत्या. पण मागील, 2019 च्या निवडणुकीत त्यांनी फक्त 103 जागी उमेदवार उभे केले होते. त्यातील केवळ एका जागी त्यांचा झेंडा फडकला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणूक पूर्व आघाडी केली होती. काँग्रेस व रष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी प्रत्येकी 125 जागा लढवल्या होत्या व अन्य 38 जागा य मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. त्या सव्वाशे जागांपैकी 44 ठिकाणी काँग्रेसचा हात विजयी झाला हता. शरद पवारांच्या नेतृत्वात एकसंघ राष्ट्रवादीनेही 125 जागी घड्याळाचे उमेदवार दिले त्या पैकी 54 ठिकाणी ते विजयी झाले. युतीमध्ये भाजपाने 152 व शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. बाकी जागा त्यांनी युतीसाठी रामदास आठवले आदिंना सोडल्या होत्या. त्या पैकी शिवसेनेला भाजपा सोबत युतीत लढून 56 जागी विजय मिळला आणि निकाला नंतर ते युती सोडून निघून गेले. त्या निवडणुकीत भाजापाचे कमळ 103 जागी विजयी झाले. या दोन मोठ्या आघाड्या व युतीपलिकडे प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व 288 ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यातील एकही उमेदवार जिंकला नाही. ओवेसींच्या एमआयएमने 44 उमेदवार उभे केले त्यातील तीन जागा ते जिंकू शकले. राजु शेट्टींचा शेतकरी पक्ष , हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, रवी राणा, विनय कोरे यांचे लहान पक्ष असे अनेक पक्ष आपापल्या प्रभाव क्षेत्रात उमेदवार घेऊन उभे मागेही राहिले होते आताही राहणारच आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेचा माहोल तयार होतो आहे. त्यातच आरक्षणाचा तिढा व गुंता वाढतो आहे. मराठा विरुदध ओबीसी वाद वाढतो आहे. राज ठाकरे, जरांगे पाटील यांनीही आपापली घोडी दामटवण्याचे ठरवले आहे. प्रकाश आंबेडकर हे पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना राजु शेट्टी, एमआयएम यांची साथ हवी आहे. चर्चांची गुऱ्हाळे सर्वत्र रंगत आहेत. प्रखर आणि संघर्षमात्मक तसेच आव्हानाचीही भाषा अधिकाधिक कर्कश्श होते आहे. पुढे पुढे हे वातावरण आणखी तप्तच होत जाणार आहे….!!
