मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेतील टक्का वाढण्यासाठी दिल्लीत अभ्यास करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना निवास, ग्रंथालय, अभ्यासिका व खाण्यापिण्याची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्यावी.जुने महाराष्ट्र सदन किंवा आणखीन पर्यायी योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह बांधावे तसेच विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या स्टायफंडमध्ये वाढ करण्यात यावी आणि हे पैसे त्यांना वेळेवर मिळावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिल्लीतील करोल बाग परिसरात राहत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना सहन कराव्या लागत असलेल्या हालअपेष्टांबाबतची माहिती जाणून घेतली. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर धक्का बसला. आयएएस, आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत महाराष्ट्रातील हजारो प्रतिभावंत विद्यार्थी अभ्यास करत आहेत परंतु त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.विपरित परिस्थितीशी दोन हात करत अभ्यास करण्याची कसरत या विद्यार्थ्यांना करावी लागत आहे.
आपल्या राज्याची संपत्ती आणि देशाचे भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र सरकारने पुरेशी निवासाची व्यवस्था केली नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना मुखर्जीनगर, करोल बाग, ओल्ड राजेंद्रनगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून रहावे लागत आहे. प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे दिल्लीतील घरभाडे, खाण्यापिण्याचा खर्च व अभ्यासावरील खर्च यांची जुळवाजुळव करताना विद्यार्थी आणि त्यांचे पालकही मेटाकुटीला आले आहेत. महागाई आणि हालअपेष्टांना कंटाळून काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने यूपीएससीची लढाई अर्ध्यावर सोडून आत्महत्या केली. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी दिल्लीतील या मराठी मुलांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे लक्ष देऊन या विद्यार्थ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
000000
