नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनापरवानगी कुठेही लावण्यात येणा-या बॅनर्स / होर्डींगमुळे शहर विद्रुपीकरण होत असून ते रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत नियमित कारवाई करण्यात येत असते.
तथापि मागील दोन दिवसात शहरात मोठया प्रमाणावर बॅनर्स लागले असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत धडक मोहीम हाती घेऊन 6 ऑगस्टला एका दिवसात 211 विनापरवानगी बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात 29, नेरुळ विभागात 40, वाशी विभागात 10, तुर्भे विभागात 28, कोपरखैरणे विभागात 18, घणसोली विभागात 42, ऐरोली विभागात 27, दिघा विभागात 17 अशाप्रकारे एकूण 211 विनापरवानगी बॅनरवर धडक कारवाई करण्यात आली.
शहरात कुठेही बॅनर / होर्डींग लावून शहराच्या सौंदर्यांला बाधा पोहचू नये व नागरिकांनाही विविध कार्यक्रमांची योग्य रितीने प्रसिध्दी करता यावी याकरिता शहरात विविध विभागांमध्ये बॅनर लावण्यासाठी एकूण 126 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
त्या जागांवर रितसर आकारात बॅनर प्रदर्शित करण्यासाठी संबधित विभाग कार्यालयामध्ये विहित शुल्क जमा करुन परवानगी देण्यात येते. त्या परवानगीचे स्टिकर लावलेल्या बॅनरवर प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
मात्र कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता विना परवानगी बॅनर लावल्यास त्या व्यक्ती / संस्थेविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येते.
स्वच्छ व सुंदर शहर असा नावलौकिक असणा-या आपल्या नवी मुंबई शहराच्या सौंदर्याला विनापरवानगी बॅनर्स / होर्डींगमुळे बाधा पोहचू नये याची काळजी नवी मुंबईकर नागरिकांनी घ्यावी असे आवाहन करतानाच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, 1995 मधील कलम 3 अन्वये दंडात्मक कारवाई व कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे याची नोंद घेण्याचे सूचित करण्यात येत आहे.
