मंत्री रवीद्र चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

 

उल्हासनगर : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत असलेल्या प्रत्येक सणामध्ये राजकीय वातावरण निर्मिती करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत चव्हाण बोलत होते.
विधानसभा निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे भाजप जोमाने कामाला लागला आहे. मोदी सरकारने मागील दहा वर्षांत २५ करोड भारतीयांना गरिबीतून बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, २०१९ मध्ये आपल्याबरोबर गद्दारी झाली; मात्र आता तसे होणार नाही. त्यामुळे पुढची पाच वर्षे विधानसभेत आपली सत्ता राहणार, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँगेस सरकार भ्रष्टाचारी सरकार होते. त्यामुळे ते पुन्हा निवडून आल्यावर योजना बंद करेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी कलानी कुटुंबावर टीका करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचला. तसेच, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी यांनीही कलानी कुटुंबाचा समाचार घेतला. आमदार कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाकडून कोणीही उमेदवार असला तरी विजय मात्र भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनु पूरस्वानी, संजय गुप्ता, प्रशांत पाटील, नरेंद्र राजानी, मीना आयलानी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *